चिदंबरम यांनी आकडेवारीसह मांडले भाजपच्या पराभवाचे भाकित

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी भाजपच्या पराभवाचे भाकित केले आहे.
Who said BJP cannot be defeated says congress leader P Chidambaram
Who said BJP cannot be defeated says congress leader P Chidambaram

नवी दिल्ली : देशात विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यात केंद्रस्थानी बिहारची विधानसभा निवडणूक आणि मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुका आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी बिहार विधानसभेसह इतर पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव होईल, असे भाकित वर्तवले आहे. यासाठी त्यांनी भाजपच्या मागील वर्षभरातील निवडणुकांमधील कामगिरीचा  दाखला यासाठी दिला आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे. या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. 

देशात 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अनेक विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुका झाल्या आहेत. यातील भाजपच्या विजयाचा टक्का मोठ्या प्रमाणात घसरला आहे, याकडे चिदंबरम यांनी लक्ष वेधले आहे. ते म्हणाले की, लोकसभेच्या 2019 मधील निवडणुकीनंतर देशात 381 विधानसभा मतदारसंघात निवडणुका झाल्या. यातील 330 मतदारसंघांत विधानसभा निवडणुका आणि 51 मतदारसंघात विधानसभा पोटनिवडणुका झाल्या आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत या 381 विधानसभा मतदारसंघापैकी 319 विधानसभा मतदासंघात भाजपचे उमेदवार जिंकले होते. आता मात्र, 381 पैकी केवळ 163 जागा भाजपने जिंकल्या आहेत. 

कोण म्हणतंय भाजपचा पराभव होऊ शकत नाही, असा सवाल करीत चिदंबरम म्हणाले की, विरोधी पक्षांनी हे लक्षात ठेवायला हवे की ते भाजपला हरवू शकतात. बिहारमध्ये हे सिद्ध होईल, अशी मला आशा आहे. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपचे मोठ्या प्रमाणात बंडखोर नेते एलजेपीत दाखल झाले आहेत. ते जेडीयूच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. यामुळे भाजप आणि चिराग पासवान यांची छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे. 

हारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com