मोठी बातमी : राज्यपालांनी तीन दिवसांत दुसऱ्यांदा घेतली अमित शहांची भेट - west bengal governor jagdeep dhakhar meets amit shah in delhi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

मोठी बातमी : राज्यपालांनी तीन दिवसांत दुसऱ्यांदा घेतली अमित शहांची भेट

मंगेश वैशंपायन
शनिवार, 19 जून 2021

पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल जगदीप धनखर विरुद्ध राज्य सरकार असा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल दिल्लीत दाखल झाले आहेत. 

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) विरुद्ध राज्य सरकार असा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल दिल्लीत दाखल झाले होते. त्यांनी आज कोलकत्याला परतण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची पुन्हा भेट घेतली. त्यांनी गेल्या तीन दिवसांत शहा यांच्याशी दुसऱ्यांदा भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. राज्यातील राजकीय हिंसाचाराच्या घटना कायम असून कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडल्याचे राज्यपालांनी केंद्र सरकारच्या कानावर घातले आहे. 

राज्यपालांची राजकीय सक्रियता पाहता त्यांना तातडीने दिल्लीला बोलावून घ्यावे, यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्रावर पत्रे पाठवत आहेत. पश्चिम बंगाल सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. यातच राज्यपालांनी दिल्ली दौरा करून केंद्र सरकारशी खलबते करण्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. 

धनखर यांनी काल पंतप्रधानांची भेट मागितली होती परंतु, त्यांना ती मिळू शकली नाही. त्यामुळे धनखर यांनी  अमित शहांना पुन्हा भेटावे असे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी आज शहांची भेट घेऊन चर्चा केली. धनखर यांनी दिल्ली दौऱ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली. त्यांनी दिल्ली दौऱ्यात काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांच्याशीही चर्चा केली. तसेच, त्यांनी कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी, सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल व विनय सहस्रबुद्धे यांच्याही गाठीभेटी घेतल्या. 

हेही वाचा : सकाळी भाजपची मिसिंगची तक्रार अन् दुपारी सरनाईक मतदारसंघात हजर 

बंगालमधील राजकीय हिंसाचाराचा मुद्दा भाजपने तापवत ठेवला आहे. धनकर यांच्या दिल्ली दौऱ्यात पश्चिम बंगालमध्ये कलम ३५६ लागू करण्याकडे झपाट्याने जात असल्याची पूर्वपीठिका तयार केली जात आहे का, अशीही शंका उपस्थित होत आहे. राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे. धनखर यांनी मंगळवारपासून दिल्लीत तळ ठोकला आहे. त्यांनी अमित शहांसोबतच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायाधीश (निवृत्त) अरुण मिश्रा यांच्याशीही चर्चा केली होती. 

बंगालमध्ये निवडणुकीचा निकाल लागल्यावर भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले होत असल्याचा भाजपचा आरोप आहे. यात सत्तारूढ तृणमूल काँग्रेसचा सक्रिय सहभाग असल्याची भाजपची तक्रार आहे. शहांची भेट घेतल्यानंतर धनखर म्हणाले की, हा काळ आमच्यासाठी लोकशाही, राज्यघटना व कायद्यावरील विश्वास कायम ठेवण्यासाठीचा आहे. सर्व नोकरशहा व  पोलिसांनी आचारसंहिता व नियमांचे पालन करावे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख