ममतादीदींचे कनिष्ठ बंधू कालिदा यांचा कोरोनामुळे मृत्यू - west bengal cm mamata banerjee younger brother dies of covid complication | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

ममतादीदींचे कनिष्ठ बंधू कालिदा यांचा कोरोनामुळे मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 15 मे 2021

देशात कोरोनाचा कहर सुरू असून, रुग्णसंख्येसोबत कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढले आहेत. 

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कनिष्ठ बंधू अशिम बॅनर्जी यांच्या कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज सकाळी कोलकत्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाविषयक नियमांचे पालन करुन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राज्याची सूत्रे पुन्हा एकदा हाती घेतल्यानंतर काहीच दिवसांत ममतांवर हा आघात झाला आहे. 

अशिम हे महिनाभरापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांच्यावर कोलकत्यातील मेडिका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अशिम हे कालिदा या नावाने ओळखले जात. ते कालिघाट परिसरात राहत होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सत्ता स्थापनेचे स्वप्न धुळीस मिळवून ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपदाची हॅटट्रिक केली आहे. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप, तृणमूलसह सर्वच पक्षांना जोरदार प्रचार केला होता. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ प्रचारात उतरले होते. परंतु, यामुळे राज्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. 

बंगालमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण 1 लाख 31 हजार 792 रुग्ण आहेत. राज्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9 लाख 50 हजार 17 आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे 12 हजार 933 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत राज्यात कोरोनाचे 20 हजार 846 रुग्ण सापडले असून, 136 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाचे एकूण 10.94 लाख रुग्ण सापडले आहेत. 

देशात 24 तासांत 3 लाख 26 हजार रुग्ण 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 26 हजार 98 रुग्ण सापडले आहेत.  मागील 24 तासांत 3 हजार 890 जणांचा मृत्यू झाला आहे.देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 43 लाख 72 हजार 907 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 66 हजार 207 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

मागील 24 तासांत देशात 3 लाख 53 हजार 299 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याच कालावधीत नवीन रुग्णांची संख्या 3 लाख 26 हजार 98 आहे. मागील पाच दिवसांत चार दिवस नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्याची संख्या अधिक आहे. देशातील महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये 70.49 टक्के बरे होणारे आहेत. 

हेही वाचा : कोरोनाचा भारतीय प्रकार अधिक धोकादायक; लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी 

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 36 लाखांवर आली आहे. सक्रिय रुग्णांची जास्त असल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 36 लाख 73 हजार 802 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 15.07 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 83.83 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 4 लाख 32 हजार 898 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.09 टक्के आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख