दे धक्का...विरोधकांचे जागावाटप ठरण्याआधीच ममतादीदींनी घेतली आघाडी

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तृणमूल काँग्रेसने आज सर्व उमेदवारांची यादी जाहीर करुन विरोधकांना मोठा धक्का दिला आहे.
west bengal cm mamata banerjee announces candidate list for assembly election
west bengal cm mamata banerjee announces candidate list for assembly election

कोलकता : आगामी विधानसभा निवडणुकीमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे आज विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी जाहीर केली. राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांचे जागावाटपाचे घोडे अडलेले असताना ममता बॅनर्जींनी सगळे उमेदवार जाहीर करुन बाजी मारली आहे. या यादीत तब्बल 50 महिलांना स्थान देण्यात आले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस सत्तेत असून, ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत 2016 मध्ये तृणमूलला 294 पैकी 211 जागा मिळाल्या होत्या, तर डावे पक्ष व काँग्रेसचे 76 उमेदवार निवडून आले होते. भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र, या वेळी भाजपने सत्तापालट करण्यासाठी जोर लावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 42 पैकी 18 जागा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. सध्या तृणमूल विरुध्द भाजप असेच  चित्र दिसत आहे. तर डावे पक्ष व काँग्रेसची आघाडी या निवडणुकीतही कायम राहणार आहे. 

तृणमूल काँग्रेसन आज 291 मतदारसंघांची उमेदवार यादी जाहीर केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. तृणमूलने त्यांच्या वाट्याला असलेल्या सर्वच्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तृणमूलने तीन जागा गोरखा जनमुक्ती मोर्चासाठी ठेवल्या आहेत. दार्जिलिंग, कलिमपोंग आणि कुरसोंग हे तीन मतदारसंघ मोर्चाला देण्यात आले आहेत. ममतांनी जाहीर केलेल्या यादीत तब्बल 50 महिलांना स्थान देण्यात आले आहे. याचबरोबर अनुसूचित जातीचे 79, अनुसूचित जमातीचे 17 आणि 42 मुस्लिम उमेदवार आहेत. 

ममता बॅनर्जी यांनी त्यांचा परंपरागत भवानीपूर मतदारसंघ सोडला असून, त्या नंदिग्राममधून लढणार आहेत. त्या 10 मार्चला नंदिग्राममधून अर्ज भरतील. त्यांच्या जागी भवानीपूरमधून सोबनदेव चट्टोपाध्याय हे लढणार आहेत. ममतांनी भवानीपूरचे 2011 पासून प्रतिनिधित्व केले आहे. ममतांचे निकटवर्ती सहकारी असलेले सुवेंदू अधिकारी हे तृणमूल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. नंदिग्राम हा अधिकारींचा बालेकिल्ला मानला जातो. आता अधिकारींच्या बालेकिल्ल्यातच त्या थेट आव्हान देणार आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com