भाजपवाले तर माओवाद्यांपेक्षा जास्त 'डेंजरस'..!

पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
west bengal chief minister mamata banerjee slams bjp over divisive politics
west bengal chief minister mamata banerjee slams bjp over divisive politics

पुरूलिया : पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर ममतांनी भाजपला लक्ष्य केले आहे. भाजप तर माओवाद्यांपेक्षा डेंजरस आहे, असा घणाघात ममतांनी केला आहे. 

पश्चिम बंगालमध्ये एप्रिल अथवा मे महिन्यात विधानसभा निवडणूक होणे अपेक्षित आहे. या निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून तृणमूल काँग्रेसला खिंडार पाडण्यात आले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून ममतांकडून भाजपचे नेते फोडले जात आहेत. ममतांनी आज नक्षलवाद्यांचा एकेकाळी गड असलेल्या पुरुलिया जिल्ह्यात रॅली काढली. त्यावेळी त्यांनी भाजपची तुलना माओवाद्यांशी केली. 

ममतांनी म्हटले आहे की, भाजप हा माओवाद्यांपेक्षा जास्त धोकादायक आहे. हा पक्ष विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जनतेला खोटी आश्वासने देऊन फसवणूक करीत आहे. पक्षाची विचारधारा ही कायम ठेवावी लागते. ती दररोज कपड्यांप्रमाणे बदलता येत नाही. ज्यांना भाजपसोबत जायचे असेल ते जाऊ शकतात. परंतु, त्या पक्षासमोर मी कधीही मान झुकवणार नाही. 

भाजप नेते आदिवासी जनतेची दिशाभूल करीत आहेत. पुरुलिया जिल्ह्यातील जंगलमहल भागातील जनतेला भाजपकडून खोटी आश्वासने दिली जात आहेत. लोकसभा निवडणूक झाल्यापासून भाजपने या भागाकडे ढुंकूनही पाहिले नव्हते, असा हल्लाबोलही ममतांनी केला. जंगलमहाल भागातील पुरुलियासह लोकसभेच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या होत्या.  

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आगामी निवडणूक नंदिग्राममधून लढवण्याचे जाहीर केले आहे. याचवेळी पारंपरिक भवानीपूर मतदारसंघ त्यांनी सोडला आहे. नंदिग्राममधूनच दहा वर्षांपूर्वी डाव्यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत ममतांनी सत्तांतर घडवले होते. 

ममतांनी नंदिग्राममध्ये प्रचारसभा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. त्यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. नंदिग्राम हा तृणमूल सोडून भाजपमध्ये गेलेले सुवेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नंदिग्रामवर अधिकारी कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. कधीकाळी तृणमूल काँग्रेसचे निष्ठावंत अशी त्यांची ओळख होती पण सुवेंदू यांनी बंडाचा झेंडा रोवत भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यानंतर येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. 

‘वॉशिंग पावडर भाजप’ असा नारा देत ममतांनी येथून निवडणूक लढविली तरी भवानीपूरकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही, असे आश्‍वासन दिले होते. जाहीर सभेतच ममतांनी थेट उपस्थित जनसमुदायाला साद घालताना ‘मी येथूनच निवडणूक लढवू का?’ अशी विचारणा केली होती. त्यावर उपस्थितांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. केंद्रामध्ये रेल्वेमंत्री असताना नंदिग्राममध्ये केलेल्या विकासकामांचा पाढाही त्यांनी वाचून दाखविला होता. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com