हात, पाय, बरगड्या मोडून डोके फोडू..नायतर थेट स्मशानभूमी; भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची धमकी - west bengal bjp president dilip ghosh threatens tmc workers | Politics Marathi News - Sarkarnama

हात, पाय, बरगड्या मोडून डोके फोडू..नायतर थेट स्मशानभूमी; भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची धमकी

वृत्तसंस्था
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. भाजपने बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. 

कोलकता : भाजपने पश्चिम बंगालमध्ये सत्तास्थापनेचा निर्धार केला आहे. राज्यात पुढील वर्षी निवडणुका होत असून, आतापासूनच भाजपने कंबर कसली आहे. भाजपकडून अतिशय आक्रमकपणे बंगालमध्ये पक्षविस्तार सुरू आहे. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी थेट सत्ताधारी तृणमूल काँग्रसेच्या कार्यकर्त्यांना जाहीर धमकी दिल्याने नवीन वाद ओढवून घेतला आहे. 

भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मैदानात उतरले आहेत. त्यांनी नुकताच बंगालच्या दौरा केला होता. मात्र, त्यांचा हा दौरा वादग्रस्त ठरला आहे.शहा यांनी बिरसा मुंडा यांचा अपमान केल्याच्या मुद्दा आता विरोधकांनी उचलून धरला आहे. अमित शहा यांच्या या दौऱ्यावरून नव्या वादाला तोंड फुटले होते. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन गदारोळ सुरू झाला आहे. 

दिलीप घोष यांनी म्हटले आहे की, मी ममतादीदींचा लोकांना सांगून ठेवतो की त्यांनी त्रास करु नये. त्यांनी सहा महिन्यांत सुधारणा करावी अन्यथा त्यांचे हात, पाय, बरगड्या मोडून डोकी फोडण्यात येतील. तुम्हाला घरी जाण्याआधी रुग्णालयात जावे लागेल. त्यांनी जास्तच त्रास दिल्यास थेट स्मशानभूमीत पाठवण्यात येईल.

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी आतापासूनच बंगालवर लक्ष केंद्रित केले आहे. शहा यांनी आदिवासीबहुल बांकुरा जिल्ह्यातून थोर स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांना वंदन करून नुकतीच त्यांनी प्रचारास सुरवात केली होती. तेथे बिरसा मुंडा यांची प्रतिमा एका शिकाऱ्याच्या पुतळ्याच्या पायाजवळ ठेवल्याने नवा वाद निर्माण झाला होता. 

अमित शहा यांचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होण्याआधी स्थानिक शिकाऱ्याच्या पुतळ्याच्या पायाशी बिरसा मुंडा यांचे छायाचित्र ठेवण्यात आले होते. स्थानिक शिकाऱ्याच्या पुतळ्याला आधी पुष्पहार घालण्यात आला होता. स्थानिक नेत्यांनी सांगितल्यानंतर शहा यांनी नंतर बिरसा मुंडा यांच्या छायाचित्राला पुष्पहार घालून वंदन केले होते. भाजपचे खासदार सुभाष सरकार यांनी या चुकीबद्दल माफी मागितली होती. 

तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी या मुद्द्यावरुन शहा आणि भाजपला लक्ष्य करण्यास सुरूवात केली होती. भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांना आता आयताच मुद्दा मिळाला होता. शहांच्या सभेतील व्यासपीठावर बिरसा मुंडा यांचा पुतळाच नव्हता. त्याजागी स्थानिक आदिवासी शिकाऱ्याचा पुतळा ठेवण्यात आला होता, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख