एकल शिक्षकांच्या मागण्यांचा प्राधान्याने विचार करू : हसन मुश्रीफ  - We will give priority to the demands of single teachers: Hasan Mushrif | Politics Marathi News - Sarkarnama

एकल शिक्षकांच्या मागण्यांचा प्राधान्याने विचार करू : हसन मुश्रीफ 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

एकल शिक्षकांच्या मागण्या चर्चा करून प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिक्षकांच्या शिष्टमंडळाला दिले.

तळेगाव ढमढेरे : राज्यातील एकल शिक्षकांच्या मागण्या चर्चा करून प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिक्षकांच्या शिष्टमंडळाला दिले. महाराष्ट्र राज्य एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचाने आमदार रोहित पवार यांच्या मध्यस्थीने नुकतीच मुंबईत मंत्री हसन मुश्रीफ यांची शिक्षकांच्या विविध मागण्यासंदर्भात शिष्टमंडळासह भेट घेतली.  

एकल शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्याध्यक्ष एल. पी. नरसाळे यांनी केले.यावेळी एकल शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत मंत्री मुश्रीफ यांच्या बरोबर आमदार रोहित पवार यांनी सविस्तर चर्चा केली व एकल शिक्षकांची बाजू मांडून, शिक्षकांना दिलासा दिला. 

आगामी काळात येणारे सर्वसमावेशक  परिपत्रक (जीआर) हे एकलला योग्य न्याय देईल, असे  आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिले. कोकणातील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली बाबत भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी थोड्याच दिवसात भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पुढील परिपत्रका (जीआर) मध्ये एकलला समान न्याय मिळावा, यासाठी मंत्री व आमदार  रोहित पवार यांच्या उपस्थितीत लवकरच मंत्रालयात एकल शिष्टमंडळाला विचारविनिमय करण्यासाठी वेळ देण्याचे यावेळी सांगण्यात आले. 

संवर्ग पद्धतीने एकच समान काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये ४  गट पडल्यामुळे संवर्ग पद्धती रद्द करून फक्त वास्तव सेवाज्येष्ठतेनेच बदल्या कराव्यात. तसेच निव्वळ पुरुषच नव्हे तर बहुसंख्य एकल महिला देखील आहेत, त्यांच्या समस्याही खूप गंभीर आहेत, हे त्यांच्या लक्षात आणून दिले. 

शिक्षकांच्या सर्व समस्या समजून घेऊन मंत्री व आमदार रोहित पवार यांनी सेवाज्येष्ठतेवर आधारित सर्वसमावेशक धोरण ठरवण्यात येईल, असे आश्वासन दिले.
 यावेळी राज्याध्यक्ष लक्ष्मण नरसाळे, विभागीय अध्यक्ष विकास उचाळे, जिल्हाध्यक्ष दादाभाऊ खेसे, राजेंद्र गरुड, सुरेश राजगुरू,  मारुती निकम, वैशाली भंडारी, पल्लवी गायकवाड,  संतोष तिखे, अनिलकुमार कांबळे, मनीषा ननावरे, दत्तात्रय भोसले, वनिता जगदाळे, शरद मचाले, वंदना गोरे आदी राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
 

हेही वाचा : आमदार निवासात आत्महत्येचा प्रयत्न करणारे शिक्षक निघाले दानवेंचे कार्यकर्ते
 
मुंबई : शिक्षक म्हणून गेली 15 वर्षे काम करूनही वेतन मिळत नव्हते त्यामुळे  वैतागून आमदार निवासातच आत्महत्या करण्याचा प्रयत्नं करणारे गजानन खैरे हे राज्यभर चर्चेचा विषय ठरले. पण खैरे हे  भाजप नेत्यांच्या जवळचे कार्यकर्ते निघाले आहेत. भाजप आमदार संतोष दानवे यांच्या आकाशवाणी आमदार निवासाच्या ४०१ या खोलीत ते काही दिवस रहात होते. त्याचबरोबर भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांबरोबर त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे. खैरे यांनी बुधवारी (ता. 16 सप्टेंबर) रोजी मुंबईतील आमदार निवासाच्या चौथ्या मजल्यावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने अनेक नेते, पोलिस आणि अग्निशामन दलाची धावपळ उडाली होती . उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत आणि इतर आमदार चौथ्या मजल्यावर जाऊन खैरे यांना लेखी आश्वासन दिले. सामंत यांना हा शिक्षक ऐकत नसल्याने समजूत काढण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनाही चौथ्या मजल्यावर जावे लागले होते. गळ्याला ब्लेड लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न खैरे यांनी केला होता . तसेच सोडविण्यासाठी येऊ नका, थेट निर्णय घ्या, असा इशाराही त्यांनी दिला होता .खैरे हे औरंगाबाद येथील रहिवासी आहेत.
Edited  by : Mangesh Mahale 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख