शिवसेनेशी युतीवर फडणवीसांचे सूचक वक्तव्य; म्हणाले, परिस्थितीनुसार निर्णय!  - We are not enemy says Devendra Fadanvis on Shivsena alliance | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेशी युतीवर फडणवीसांचे सूचक वक्तव्य; म्हणाले, परिस्थितीनुसार निर्णय! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 जुलै 2021

आमच्यात कधी शत्रुत्व नव्हतंच. आम्ही शत्रु नाही, असंही फडणवीस म्हणाले.

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यातच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांची भेट झाली. त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजप व शिवसेना राज्यात पुन्हा एकत्र येणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सूचक वक्तव्य केलं आहे. (We are not enemy says Devendra Fadanvis on Shivsena alliance)

राऊत व शेलार यांच्या भेटीविषयी माहिती नसल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, कोणाच्या भेटीगाठी झाल्या याबाबत मला माहिती नाही. अधिकृतपणे कोणाचीही भेटगाठ नाही किंवा चर्चा नाही. भाजप हा सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊन विरोधी पक्ष म्हणून जनतेसाठी लढाई लढण्याची आमची तयारी आहे. 

हेही वाचा : ठाकरे सरकारची आठ अधिवेशनं, कालावधी केवळ 38 दिवस!

शिवसेना व भाजपच्या युतीवर बोलताना फडणवीस म्हणाले, आमच्यात कधीच शत्रुत्व नव्हतंच. आम्ही शत्रु नाही. आमच्यात वैचारीक मतभेद झाले कारण आमचे मित्र आमचा हात सोडून ज्यांच्या विरोधात निवडून आले त्यांचाच हात पकडून निघून गेले. त्याच्यामुळे मतभेद उभे झाले. राजकारणामध्ये जर तर अर्थ नसतो. जी परिस्थिती येते त्यानुसार निर्णय होत असतात. जर तर वर जे राजकारणी राहतात ते स्वप्नच पाहत राहतात, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

अधिवेशनाविषयी बोलताना फडणवीसांची टीका

राज्य सरकारची आतापर्यंत सात अधिवेशनं झाली असून त्याचा कालावधी 36 दिवस एवढा आहे. उद्यापासून सुरू होणारे आठव्या अधिवेशनाचे दोन दिवस धरले तर हा कालावधी 38 दिवस होतो. सरासरी पाहिली तर एक अधिवेशन पाच दिवसही चाललं नाही. कोविडच्या काळात झालेली अधिवेशनं पाहिली तर हे दोन दिवस पकडून 14 दिवस चालली आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  

विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, कोरोना काळात संसदेची अधिवेशन 69 दिवस चालली. कोविडच्या नावावर लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम सरकार करत आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीला 60 वर्ष पूर्ण होत असताना जे कधीच घडलं नाही ते आता घडताना दिसतंय. राज्य सरकारने विधीमंडळात सदस्यांना बोलू नये अशी व्यवस्था केली आहे. मिनिट्समध्ये लिहिलं आहे की कोणतंही संसदीय आयुध वापरता येणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. अशाप्रकारची लोकशाही आणीबाणीच्या काळात पाहिली असेल. 

अधिवेशन सुरू झाल्यानंतर शोकप्रस्ताव, काही बिलांवर चर्चा होईल. तर परवा पुरवणी मागण्यांसाठी दिवस दिला आहे. ओबीसी, मराठा आरक्षणाबाबत तरतूद नसेल तर ते मांडता येणार नाही. राज्यात 100 हून अधिक विषय असून वेळ नसल्याने मांडता येणार नाहीत, अशी टीका फडणवीस यांनी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख