शरद पवारांना आलेल्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही.. - We are not afraid of the threats made to Sharad Pawar  | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांना आलेल्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

धमकी दाऊत देतोय की दुबईत बसून कोण सोम्या-गोम्या देतोय माहीत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आलेल्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. ही धमकी दाऊत देतोय की दुबईत बसून कोण सोम्या-गोम्या देतोय माहीत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले. जयंत पाटील म्हणाले की दाऊतला भारतात आणण्याच्या सर्व प्रक्रिया पार पडल्या असल्याचं केंद्र सरकार सांगतंय तर मग धमक्या येतात कुठून, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. मुंबईची तुलना ज्यांनी पाकिस्तानशी केली त्यांना सुरक्षा दिली. त्यांच्यावर कोण हल्ला करणार आहे. महाराष्ट्र हा सृजन आहे. गांधी मार्गाने चालणारा आहे, मग सुरक्षेची गरज काय, असे पाटील यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिचे नाव न घेता स्पष्ट केलं. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला आहे. हे दोन्ही  फोन भारताबाहेरून आले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री'प्रमाणे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षावरही धमकीचा फोन आला होता. कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. कॉल हा दुबईतून आला होता का याची शहानिशा पोलीस करीत आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी धमकीचे कॉल आल्याची धक्कादायक बाब काल समोर आली. हे कॉल दुबईतून आल्याचे समोर आले असून, हे कॉल अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या हस्तकाने केल्याचे समजते. यामुळे सुरक्षा यंत्रणा दक्ष झाल्या असून, मातोश्री परिसरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. याचबरोबर या कॉलची शहानिशाही करण्यात येत आहे. दरम्यान, या निनावी धमकीबद्दल काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच, या प्रकाराचा तीव्र निषेधही करण्यात आला. 

राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक काल झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याच्या प्रकारावर चर्चा झाली. हे प्रकरण खूप गंभीर असून, केंद्र सरकारने याची तातडीने दखल घ्यावी आणि यामागे जे कोणी असतील त्यांना शोधून कठोर शिक्षा करावी, अशा तीव्र भावना मंत्रिमंडळाने व्यक्त केल्या आहेत. या वेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात गुन्हे शाखेने कसून तपास सुरू केला आहे, अशी माहितीही दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख