माझा लढा पदासाठी नव्हताच : सचिन पायलटांचा दावा - Was not fighting for any post Claims Sachin Pilot | Politics Marathi News - Sarkarnama

माझा लढा पदासाठी नव्हताच : सचिन पायलटांचा दावा

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

राहुल व प्रियंका यांच्याशी झालेल्या भेटीनंतर पक्षाने आता तीन सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती पायलट यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर विचार विनिमय करणार आहे. स्वतः पायलट यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली. राजकारणात व्यक्तीगत शत्रुत्वाला स्थान नसते, असेही विधान त्यांनी केले

जयपूर : ''पदे मिळतात आणि जातातही. माझा लढा हा पदासाठी नव्हताच. आम्हाला लोकांचा आमच्यावरचा विश्वास दृढ करण्यासाठी काम करण्याची गरज आहे,''  असे प्रतिपादन सचिन पायलट यांनी येथे केले.  मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले होते. आता पायलट यांचे बंड शमल्याची चिन्हे आहेत. राज्यपालांनी १४ ऑगस्टला विधानसभा अधिवेशन बोलावले आहे. यामुळे राज्यातील राजकीय हालचाली पुन्हा वेगवान झाल्या आहेत. मात्र, या निमित्ताने पायलट यांचे बंड फसले की भाजपची खेळी फसली हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलट यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची काल भेट घेतली होती. यानंतर आज त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यांना तातडीने भेटीची वेळ देण्यात आली. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत राहुल यांच्यासोबत प्रियांका गांधी याही होत्या. या दोन्ही नेत्यांनी पायलट यांच्याशी चर्चा केली. याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि के.सी.वेणुगोपाल यांच्या संपर्कात पायलट कायम होते. पायलट यांनी आता मवाळ भूमिका घेतली आहे. ते पक्षात परत येण्याच्या प्रयत्नात आहेत. याचवेळी त्यांच्यासोबत गेलेले बंडखोर आमदारही परत येण्यासाठी पक्ष नेतृत्वाच्या संपर्कात आहेत.

राहुल व प्रियंका यांच्याशी झालेल्या भेटीनंतर पक्षाने आता तीन सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती पायलट यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर विचार विनिमय करणार आहे. स्वतः पायलट यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली. राजकारणात व्यक्तीगत शत्रुत्वाला स्थान नसते, असेही विधान त्यांनी केले. राहुल व प्रियंका यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व आम्ही उपस्थित केलेले मुद्दे सोडवण्यासाठी निश्चित कार्यक्रम आखला जाईल, असे आश्वासनही दिल्याचे पायलट यांनी सांगितले. 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांचा उल्लेख 'निकम्मा' असा केला होता. त्याबाबत प्रतिक्रिया देणे पायलट यांनी टाळले. माझ्या कुटुंबाचे माझ्यावर काही संस्कार आहेत. माझा कुणाला कितीही विरोध असला तरी मी असली भाषा वापरत नाही. गेहलोत माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि मी त्यांचा आदर करतो. मात्र मला कामाशी संबंधित मुद्दे उपस्थित करण्याचा पूर्ण अधिकार आहे, एवढेच पायलट यांनी सांगितले. 
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख