पंढरपुरात वारकरी संघटनेत मतभेद.. "वंचित"च्या आंदोलनाला विरोध.. - Warkari Pike team has a different role in the movement | Politics Marathi News - Sarkarnama

पंढरपुरात वारकरी संघटनेत मतभेद.. "वंचित"च्या आंदोलनाला विरोध..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

वारकरी पाईक संघाने आंदोलनाबाबत वेगळी भूमिका जाहीर केल्याने वारकर्यांमध्येच आंदोलना बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 

पंढरपूर : "विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी विश्व वारकरी संघटनेसह बहुजन वंचित आघाडाने केली आहे. याच मागणीसाठी संघटनांनी  31 ऑगष्टला पंढरपुरात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आंदोलनाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच वारकरी पाईक संघाने आंदोलनाबाबत वेगळी भूमिका जाहीर केल्याने वारकर्यांमध्येच आंदोलना बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 

वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते रामकृष्ण वीर महाराज यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वंचित आणि विश्व वारकरी संघटनेच्या संख्यात्मक आंदोलनाला आमच्या वारकरी संघटनेचा पाठिंबा नसल्याचे आज स्पष्ट केले आहे. पाईक वारकरी संघाने घेतलेल्या या भूमिकेमुळे वारकरी संघटनेतील मतभेद देखील या निमित्ताने समोर आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 22 मार्च पासून विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर पुन्हा भाविकांना दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी बहुसंख्य वारकरी संघटनांसह बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.  

राज्य सरकारने 31 ऑगष्ट पूर्वी विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी खुले करावे, अन्यथा 31 ऑगष्ट रोजी 1 लाख वारकऱ्यांसमवेत आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलन दोन दिवसांवर येऊन ठेपलेले असतानाच वारकरी पाईक संघाने या आंदोलनाला थेट पाठींबा न देता वेगळी भूमिका घेतली आहे. वारकरी  संघटनेच्या दोन वेगवेगळया भूमिकेमुळे सर्व सामान्य वारकऱ्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.

विश्व वारकरी संघटनेचे अध्यक्ष अरूण महाराज बुरघाटे यांनी मंदिर दर्शनासाठी खुले करावे, अन्यथा वारकरी मंदिरात जावून दर्शन घेतील, असा इशारा दिला आहे तर वारकरी पाईक संघटनेने मात्र संख्यात्मक आंदोलनाला आपला पाठिंबा  नसल्याचे सांगत, वारकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन केले आहे.

सध्या पितृ पक्ष पंधरवाडा सुरू होत आहे. त्यामुळे अधिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून मंदिर दर्शनासाठी खुले करावे, अशी भूमिकाही त्यांनी  मांडली आहे. मंदिर खुले करावे या मागणीवरूच वारकरी संघटनामध्येच दोन मतप्रवाह समोर आले आहेत. राज्य सरकार मंदिर उघडण्याबाबत आता कोणता निर्णय घेणार याकडेच वारकरी व भाविकांचे लक्ष लागले आहे.
Edited  by : Mangesh Mahale   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख