धक्कादायक : आग लागली त्यावेळी रुग्णालयातील सर्व कर्मचारी होते झोपेत - virar hospital staff was asleep when fire tragedy happened | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : आग लागली त्यावेळी रुग्णालयातील सर्व कर्मचारी होते झोपेत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतानाच रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

विरार : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतानाच रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत आयसीयूतील १३ कोरोना रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये पाच महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, ही घटना घडली त्यावेळी रुग्णालयातील सर्व कर्मचारी झोपले होते आणि आयसीयूतील रुग्णांना बाहेर काढण्यासह कुणी नव्हते, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चैाकशीचे आदेश दिले आहे. नाशिक येथील रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागातील (आयसीयू) एसीचा स्फोट झाला. या अतिदक्षता विभागात १७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते.  अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला परंतु, आयसीयूतील 13 रुग्णांचा मात्र, मृत्यू झाला. या रुग्णालयात एकूण ९० जणांवर उपचार सुरू होते. 

आता रुग्णालयातील मृतांच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग सगळ्यांसमोर मांडला आहे. एका मृताच्या नातेवाईकाने म्हटले आहे की, आग लागली त्यावेळी रुग्णालयातील सर्व कर्मचारी झोपलेले होते. आयसीयूतील रुग्णांना बाहेर काढण्यास रुग्णालयातील एकही कर्मचारी हजर नव्हता. रुग्णालयात अग्निशामक यंत्रणाही नव्हती. ही सर्व रुग्णालय व्यवस्थापनाचीच चूक आहे. 

एका महिला डॉक्टरच्या आईचाही या आगीत मृत्यू झाला आहे. ती म्हणाली की, आग विझवण्यासाठी रुग्णालयात एखादी यंत्रणा असती तर ती विझवता आली असती. मी माझी आई गमावून बसले आहे. ती आजारातून बरी होत होती. रुग्णालयात आग विझवण्याची यंत्रणा असती तर माझी आई वाचली असती. मीच आईला या रुग्णालयात दाखल केले होते. आता मी माझ्या आईला कुठे शोधू? 

रुग्णालयाबाहेर मृतांच्या नातेवाईकांना दु:ख आवरता येत नसल्याचे चित्र आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त रुग्णालयाबाहेर तैनात करण्यात आला आहे. पोलीस आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील ऑक्सिजन व व्हेटिलेटरवर असलेल्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले आहे. 

मृतांची नावे :
१) उमा सुरेश कंगुटकर (वय ६३)
२) निलेश भोईर (वर्ष ३५)
३) पृथ्वीराज वल्लभदास वैष्णव (वय ६८)
४) रजनी कडू (वय ६०)
५) नरेंद्र शंकर शिंदे (वय ५८)
६) जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (वय ६३)
७) कुमार किशोर दोशी (वय ४५)
८) रमेश उपयान (वय ५५)
९) प्रवीण शिवलाल गौडा (वय ६५)
१०) अमेय राजेश राऊत (वय २३)
११) शमा अरुण म्हात्रे (वय ४८)
१२) सुवर्णा पितळे (वय ६४)
१३) सुप्रिया देशमुख (वय ४३)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख