बांगलादेशात मोदींचे पाऊल पडताच लोक उतरले रस्त्यावर...चार जणांनी गमावले प्राण - violent protest erupts in bangladesh after narendra modi visit | Politics Marathi News - Sarkarnama

बांगलादेशात मोदींचे पाऊल पडताच लोक उतरले रस्त्यावर...चार जणांनी गमावले प्राण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 मार्च 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर असून, कोरोनाचा प्रादुर्भाव देशात सुरु झाल्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. 

ढाका : पंतप्रधान मोदी हे बांगलादेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून, भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. परंतु मोदींचे पाऊल बांगलादेशात पडताच हिंसक आंदोलन सुरू झाले आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड सुरू आहे. पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार धुमश्चकी सुरू असून, यात चार जण ठार झाले आहेत. 

चितगाव शहरात मोदींच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. याच चार जण ठार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि रबरी गोळ्यांचा वापर केला जात आहे. काही आंदोलकांना पोलीस ठाण्यात घुसून तोडफोड केली. आठ जखमी आंदोलकांना रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. 

हिफाजते इस्लाम बांगलादेशचा विरोध 

मोदींच्या बांगलादेश भेटीला हिफाजते इस्लाम बांगलादेश या मुस्लिम संघटनेचा विरोध आहे. मोदी हे भारतात हिंदूंना प्राधान्य देऊन मुस्लिमांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा या संघटनेचा आरोप आहे. मोदी हे धार्मिक तणावाला खतपाणी घालत असल्याचा आरोप करीत या संघटेनने मोदींच्या दौऱ्याला आधीपासून विरोध केला होता. दोन्ही देशांदरम्यान मोदी धार्मिक तणाव निर्माण करीत असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे. 

ढाक्यात मुख्य मशिदीसमोर मोठा राडा 
ढाक्यात मुख्य मशिदीसमोरही जोरदार राडा झाला. पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या आणि रबरी गोळ्यांचा वापर करुन जमावाला पांगवले. यात अनेक जण जखमी झाले आहेत. मशिदीसमोर काही जणांनी मोदींचा अवमान करण्यासाठी पादत्राणे हातात पकडून दाखवली. या वेळी काही जणांनी याला विरोध केल्याने दोन्ही गटांमध्ये जुंपली. जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यात पोलिसांसह पत्रकारही जखमी झाले आहेत.  

मुक्तीलढ्यातील हुतात्म्यांना मोदींची आदरांजली 

मोदींनी आज मुक्तीलढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. या सर्व हुतात्म्यांनी सत्याच्या विजयासाठी अन्यायायाविरोधात लढा दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. बांगलादेशच्या राष्ट्रीय दिनानिमित्त नॅशनल परेड स्क्वेअरमध्ये आयोजित कार्यक्रमात मोदींनी हजेरी लावली. या वेळी ते म्हणाले की, बांगलादेशच्या मुक्तीलढ्यामध्ये आमच्या जवानांनीही रक्त सांडले. दोन्ही देशांमधील रक्ताचे हेच नाते अत्यंत मजबूत अशा द्विपक्षीय संबंधांना जन्म देईल.  

Edited by Sanjay Jadhav 

हेही वाचा :

- पंतप्रधान मोदी म्हणतात, बांगलादेशच्या मुक्तीलढ्यासाठी माझंही योगदान अन् मलाही अटक!

- पंतप्रधान मोदींची 'व्हॅक्सिन डिप्लोमसी'; बांगलादेशला मोठे गिफ्ट 

- पंतप्रधान मोदींची 'व्हॅक्सिन डिप्लोमसी' अडचणीत; सरकारसमोर धर्मसंकट

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख