सरकार बनवले त्यांनीही डोक्याला हात लावला असेल; सहस्रबुद्धेंचा पवारांवर निशाणा

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरू असून, राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अशात मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत, अशी टीका भाजपचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी केली.
vinay sahasrabuddhe targets uddhav thackeray and sharad pawar
vinay sahasrabuddhe targets uddhav thackeray and sharad pawar

नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यातील नाकर्त्या सरकारमुळेच कोरोना हाताबाहेर गेल्याचा ठपका भाजपचे खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी  ठेवला. राज्यातील सरकार बनविण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्यांनीही डोक्‍याला हात लावला असेल, असा टोलाही सहस्रबुद्धे यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नामोल्लेख न करता लगावला. 

राज्यसभेत बोलताना सहस्रबुद्धे यांनी महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. ते म्हणाले की, देशातील 10 सर्वाधिक कोरोनाग्रस्त शहरांत महाराष्ट्रातील चार शहरे असताना राज्याचे नेतृत्व करणारे मात्र घराबाहेरही पडत नाहीत. तसेच, मंत्रालयात जात नाहीत. लोकल सेवा सुरू करणे, लॉकडाउन उठवणे, मिशन बिगिन अगेन या साऱ्यातच राज्य सरकारने गोंधळ केल्याचा फटका जनतेला बसला. 

पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी 15 वेळा बैठका घेतल्या होत्या. या बैठकीत एकाही मुख्यमंत्र्याने लॉकडाउन लागू करण्यास विरोध केला नव्हता. विरोधी पक्षांनी असा दुटप्पीपणा टाळायला हवा, असे सहस्रबुद्धे म्हणाले. राज्य सरकारला कोरोना स्थिती हाताळण्यात साफ अपयश आल्याचा ठपका सहस्रबुद्धे यांनी ठेवल्यावर समाजवादी पक्षाच्या सदस्य जया बच्चन यांनी डॉ. सहस्त्रबुध्दे यांना जोरदार विरोध केला. 

दरम्यान, अतिशय घाईगडबडीने आणि राज्यांना विश्‍वासात न घेता अचानक घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरात असंघटित मजुरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्याबद्दल देशाच्या संसदेने कोट्यवधी श्रमिकांची माफी मागितली पाहिजे, अशा शब्दांत विरोधी पक्षांनी लॉकडाऊनवर राज्यसभेत ताशेरे ओढले. कोरोना उद्रेकाच्या तोंडावर भारताने केलेला एक नमस्ते (नमस्ते ट्रम्प मेळावा) देशाला भलताच महागात गेला, असा चिमटा राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रा. मनोज झा यांनी काढला. नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाबाबत टोला लगावताना, हा विदेशातून आलेला विषाणू असल्याचे झा यांनी सांगितले. 

मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पाडणे आणि नमस्ते ट्रम्प कार्यक्रम या दोन गोष्टींसाठी देशात लॉकडाउन जाहीर करण्यास विलंब लावण्यात आला, असा आरोप द्रमुकचे नेत तिरुची सिवा यांनी केला. बिजू जनता दलाचे प्रसन्न आचार्य यांनी कोरोना महामारीबाबत वैद्यकीय जागृती वाढविण्याची गरज प्रतिपादन केली. वायएसआर काँग्रेसचे के केशव राव यांनी केंद्र सरकारचा राज्यांवर विश्‍वास राहिला नाही का, असा सवाल केला. 

कोरोना महामारीवरील या चर्चेत पंतप्रधान केअर निधीबाबतही अनेक नेत्यांनी संशय व्यक्त केला. मात्र, अपवाद वगळता साऱ्याच वक्‍त्यांची गाडी कोरोनाऐवजी राजकारणावरच घसरल्याबद्दल अनेक सदस्यांनी नापसंती व्यक्त केली. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन उद्या चर्चेला उत्तर देतील. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com