विलासराव मुख्यमंत्री झाले.. आता अब्दुल सत्तारांचे काय?  - Vilasrao became the Chief Minister .. Now what about Abdul Sattar?   | Politics Marathi News - Sarkarnama

विलासराव मुख्यमंत्री झाले.. आता अब्दुल सत्तारांचे काय? 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

जळगावात झालेल्या ३२ वर्षापूर्वीच्या घटनेची आठवण ताजी झाली. विलासराव देशमुख यांची गाडीही अभाविपच्या कार्यकर्त्यांनी अडवली होती.

जळगाव: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी धुळ्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी रोखली. आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला... अन् जळगावात झालेल्या ३२ वर्षापूर्वीच्या घटनेची आठवण ताजी झाली. तत्कालीन शिक्षणमंत्री विलासराव देशमुख यांची गाडीही अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जळगावात अडवली होती.

त्यावेळीही कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. हे प्रकरण थेट विधानसभेतही गाजले होते. फि वाढही रद्द झाली. मात्र, या आंदोलनानंतर विलासरावांची गाडी राजकारणात गतीने पुढे गेली अन् ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. धुळे येथे मंत्री सत्तार यांचीही गाडी विद्यार्थ्यांनी रोखत आंदोलन केले. आंदोलनानंतर आता मंत्री अब्दुल सत्तारांच्या वाट्याला पुढे काय? हे आगामी काळात दिसून येईल.

राज्याचे मुख्यमंत्री सुधाकरराव देशमुख असतांना त्यांच्या मंत्रीमंडळात शिक्षणमंत्रीपदी विलासराव देशमुख होते. त्यावेळी खानदेश पुणे विद्यापीठातर्गंत होते. त्यावेळी सरकारने महाविद्यालयीन फि वाढीचा निर्णय घेतला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने त्याला विरोध करून राज्यभर आंदोलस सुरू केले होते. लातूर येथे विद्यार्ध्यांनी आंदोलन केल्यावर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मारहाण झाली होती. त्यानंतर देशमुख जळगाव दौऱ्यावर आले होते.
 
लातूर येथे विद्यार्थ्यावर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्याचा निर्णय विद्यार्थी परिषदेने घेतला. मात्र, अत्यंत गनिमी काव्याने हे आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख व सध्या कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिलीप रामू पाटील होते. तर तत्कालीन शहर प्रमुख व सध्या जळगाव येथील मु.जे. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य अनिल राव होते. तर विद्यार्थीनी विभागाच्या प्रमुख मीनल पटेल होत्या. सध्या त्या आयसीआसीआय बँकेत अधिकारी आहेत. 

शहरातील नटवर टॉकिज चौकात असलेल्या अभाविपच्या कार्यालयात रात्री आंदोलनाचे नियोजन करण्यात आले. सकाळी अकरा वाजता जळगाव येथील पदमालय विश्रामगृहातून मंत्री विलासराव देशमुख आपल्या कार्यक्रमास्थळी निघाले असताना जिल्हा प्रमुख दिलीप रामू पाटील, विद्यार्थिनी प्रमुख मीनल पाटील यांच्या नेतृत्वाखाली घोषणा देत कार्यकर्त्यांनी नेहरू चौकात त्यांची गाडी अडविली.

आदोलन नियोजित नसल्यामुळे पोलीस बंदोबस्त नव्हता, अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलीसांची ताराबंळ उडाली. कंट्रोल रूमला माहिती देवून बंदोबस्त मागविण्यात आला. पोलिसाची कुमक आल्यानंतर लाठीजार्च करण्यात आला. व कार्यकर्त्यानाही ताब्यात घेण्यात आले. जळगावात विद्यार्थ्यावर झालेल्या या लाठीमाराचे पडसाद राज्यभर उमटले होत. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक व शिक्षणमंत्री विलासराव देशमुख यांनी अभाविपच्या शिष्टमंडळास पाचारण करून फि वाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला.
 
अन् विलासराव मुख्यमंत्री झाले
जळगाव येथे विलासराव देशमुख यांची गाडी अडविल्यानंतर विद्यार्थ्यावर झालेल्या लाठीमाराचे प्रकरण राज्यभर गाजले, त्यांच्या विरूध्द आंदोलनही झाले. मात्र, विलासरावांची राजकारणाची गाडी वेगात पुढे केली अऩ् ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. अभाविपने जळगावात त्यांची गाडी रोखल्यामुळे त्यावेळी फि वाढ रद्द होवून यश मिळाले परंतु विलासरावांना पुढे मुख्यमंत्रीपद मिळाले.

आता अब्दुल सत्तारांचे काय?
धुळे येथे मंत्री अब्दुल सत्तार यांची गाडीही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अडविली विद्यार्थ्यांवर लाठीमारही करण्यात आला. याचे पडसाद राज्यभर उमटत आहे. विधीमंडळातही हा प्रश्‍न निश्चित गाजणार आहे. त्यामुळे सत्तारांची राजकीय गाडी पुढे कशी धावणार याकडेच लक्ष असणार आहे. विलासराव देशमुखाप्रमाणे त्यांनाही हे आंदोलन पावणार काय? हे आगामी काळात दिसून येईल. 
Edited  by : Mangesh Mahale      

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख