उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू कोरोना पॉझिटिव्ह - Vice President of India venkaiah naidu tested covid19 positive | Politics Marathi News - Sarkarnama

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू कोरोना पॉझिटिव्ह

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

देशभरात कोरोनाचा कहर सुरू असून, देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 61 लाखांवर गेला आहे. आता उपराष्ट्रपती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा कहर कायम असून, रुग्णसंख्या विक्रमी वेगाने वाढत आहे. आता उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. उपराष्ट्रपती कार्यालयाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. नायडू यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नसून, नियमित तपासणीवेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

उपराष्ट्रपती कार्यालयाने ट्विटरवर म्हटले आहे की, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांची नियमित कोरोना चाचणी करण्यात आली. ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांना निवासस्थानीच विलगीकरणात राहण्याच्या सल्ला देण्यात आला आहे. नायडू हे पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्या पत्नी उषा नायडू यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. 

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सुरुवातीला गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या महिन्याच्या सुरवातीला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी पॉझिटिव्ह सापडले होते. याचबरोबर केंद्रीय कृषी राज्य मंत्री कैलाश चौधरी, आयुष मंत्री श्रीपाद नाईक, जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल हे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. कर्नाटकातील भाजपचे खासदार अशोक गस्ती आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

संसदेचे पावसाळी अधिवेशन याच महिन्यात झाले. अधिवेशनाआधी खासदारांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. यात अनेक खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. कोरोना झालेल्या खासदारांना अधिवेशनात प्रवेश दिला जात नव्हता. गडकरी यांनी अधिवेशनला हजेरी लावल्यानंतर  ते पॉझिटिव्ह सापडल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर नेत्यांना खबरदारीचे उपाय घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. 

हे ही वाचा : बाप रे...भारतात दर 15 पैकी एकाला कोरोना!

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरू असून, रुग्णसंख्या विक्रमी वेगाने वाढत आहे. सध्या दर 15 पैकी एक भारतीयाला कोरोनाचा संसर्ग झाला असावा, असे निरीक्षण भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) नोंदवले आहे. देशात सध्या प्रति दहा लाख लोकसंख्येमागे 70 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. याची जागतिक सरासरी 127 असून भारतात सर्वांत कमी कोरोना मृत्यूदर असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाने  केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख