भाजपमधील वाद चव्हाट्यावर..पोस्टरवरुन माजी मुख्यमंत्रीच गायब

राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार कोसळण्याची वाट पाहत असलेल्या भाजपमधील अंतर्गत कलह आता टोकाला गेला आहे.
vasundhara raje is missing from bjp posters in rajasthan
vasundhara raje is missing from bjp posters in rajasthan

जयपूर : राजस्थानमधील (Rajasthan) काँग्रेसचे (Congress) सरकार कोसळण्याची वाट पाहत असलेल्या भाजपमधील (BJP) अंतर्गत कलह आता टोकाला गेला आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje)आणि प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया (Satish Puniya) यांच्यातील वाद वाढत चालला आहे. आता भाजपच्या पोस्टरवरुन वसुंधरा राजे गायब झाल्या आहेत. यावरुन मोठा गदारोळ सुरू झाला आहे. मागील 20 वर्षांत प्रथमच भाजपच्या पोस्टरमधून राजे गायब झाल्या आहेत.  

राजस्थानमध्ये सध्या पोस्टरवॉर रंगले आहे. राज्यात सगळीकडे भाजपचे पोस्टर लावण्याची मोहीम सुरू आहे. विशेष म्हणजे या पोस्टरमधून वसुंधरा राजे या गायब  आहेत. यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांच्यासह राज्यातील चार नेत्यांची छायाचित्रे आहेत. मात्र, यात राजेंचे छायाचित्र नसल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. मागील 20 वर्षांत प्रथमच भाजपच्या पोस्टरमधून राजे गायब झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप अडीच वर्षांचा कालावधी बाकी असताना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, यावरून भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राजस्थानमधील सत्ताधारी काँग्रेससह विरोधी पक्ष असलेल्या भाजपला अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागत आहे. वसुंधरा राजे यांच्या समर्थकांकडून त्यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यात वसुंधरा राजे यांच्याशिवाय मुख्यमंत्रिपदासाठी लायक कोणताही नेता नाही, त्याच एकमात्र सर्वश्रेष्ठ नेत्या आहेत, अशी वक्तव्ये त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहेत. त्यामुळं पक्षात दोन गट पडले आहेत. याचाच फटका अखेर त्यांना बसल्याचे मानले जात आहे. 

वसुंधरा राजे याच मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असतील असे वक्तव्य केल्याबद्दल त्यांचे निकटवर्ती व भाजपचे ज्येष्ठ नेते रोहिताश्व शर्मा यांच्यासह सहा जणांना प्रदेश कार्यालयाने नुकतीच कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. यामध्ये प्रदेश महामंत्री भजनलाल, प्रताप सिंह सिंघवी यांचाही समावेश आहे. राज्यात पहिल्यांदाच वसुंधरा राजे यांच्या समर्थकांना अशाप्रकारची नोटीस पाठवण्यात आली होती. दिल्लीतूनच तसे आदेश आले असून या नेत्यांना लगाम लावण्यासाठी ही कारवाई सुरू असल्याची चर्चा होती. 

देशात काँग्रेसचे जशी स्थिती आहे, तशी स्थिती राजस्थानमधील भाजपची झाल्याची टीका शर्मा यांनी केली होती. या घडामोडींवर वसुंधरा राजे यांच्याकडून कोणतंही वक्तव्य आलं नसलं तरी समर्थकांकडून वेगळी चूल मांडली जात आहे. भाजपपासून फारकत घेत अनेक कार्य़क्रमांचे आयोजन केले जात आहे. राजे यांनाच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी केली जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com