वसंतदादा पाटील यांचे सहकारी जयराम कुष्ठे यांचे निधन  - Vasantdada Patil's colleague Jayaram Kushthe passed away | Politics Marathi News - Sarkarnama

वसंतदादा पाटील यांचे सहकारी जयराम कुष्ठे यांचे निधन 

संपत मोरे
रविवार, 23 ऑगस्ट 2020

क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी, क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड, हुतात्मा किसन अहिर, देहभक्त पांडू मास्तर यांच्या परंपरेचा एक सहकारी जयराम कुष्ठे आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

पुणे: ब्रिटिशांच्या कैदेत असताना 24 जुलै 1943 रोजी वसंतराव दादा पाटील यांनी सांगलीचा तुरुंग फोडला होता. यावेळेचे वसंतदादा पाटील यांचे सहकारी जयराम विष्णुपंत कुष्ठे यांचे आज निधन झाले. या मोहिमेत एकूण 17 क्रांतिकारक सहभागी होते. त्यापैकी जयराम कुष्टे हयात होते. त्यांच्या निधनाने तुरुंगफोड मोहिमीतील एक साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी लढणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी, क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड, हुतात्मा किसन अहिर, देहभक्त पांडू मास्तर यांच्या परंपरेचा एक सहकारी जयराम कुष्ठे आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

जयराम कुष्ठे यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी आपले मूळ गाव सोडले आणि सांगलीत आले. सांगलीत आल्यावर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. अनेक मोहिमा त्यांनी पार पाडल्या. वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत अनेक धाडसी जबाबदाऱ्या घेतल्या, कसलीही पर्वा न करता पूर्ण केल्या.

ब्रिटिश सरकारच्या विरोधात चळवळ करणाऱ्या वसंतदादा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना इंग्रजांनी पकडून सांगलीच्या तुरुंगात ठेवले. तेव्हा त्यांच्यासोबत जयराम कुष्ठे होते. दादा व त्यांच्या सहकाऱ्यांनी तुरुंग फोडण्याची मोहीम आखली. ही धाडसी मोहीम पार पाडत असताना पोलिसांनी गोळीबार केला.

या गोळीबारात बाबुराव जाधव, अण्णासाहेब पत्रावळे यांना वीरमरण आलं. वसंतदादा पाटील यांच्या खांद्याला गोळी लागली. या धाडसी मोहिमेत सहभागी असणाऱ्या पैकी जयराम कुष्ठे एकमेव हयात  होते. त्या आठवणी त्यांच्याकडून अनेकांनी ऐकल्या होत्या.

त्यांच्या वयाची शंभर वर्षे पूर्ण झाल्यावर विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि सांगली जिल्ह्यातील पुरोगामी संघटनांनी त्यांचा सत्कार केला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी, 'हे स्वातंत्र्य खरे नाही' अशी खंत व्यक्त केली होती. स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान देणारे क्रांतिकारक जयराम कुष्ठे यांची खूप उपेक्षा झाली.

ते आयुष्याच्या अखेरपर्यंत गांधीवादाशी एकनिष्ठ राहिले. ते कधीही सत्तेच्या जवळ गेले नाही. आयुष्यभर त्यानी साधी राहणीमान स्वीकारले. त्यांच्या निधनाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी जीवावर उदार लढणारा आणि सांगली तुरुंगफोड या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख