आपल्याकडं कोरोना लस असून, ती सर्वांचा जीव वाचवणार; पंतप्रधान मोदींची ग्वाही - Vaccines absolutely important to save lives says narendra modi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

आपल्याकडं कोरोना लस असून, ती सर्वांचा जीव वाचवणार; पंतप्रधान मोदींची ग्वाही

वृत्तसंस्था
बुधवार, 26 मे 2021

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. यामुळे सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. 

नवी दिल्ली : देशात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली आहे. यामुळे सरकारने लसीकरणावर (Covid Vaccination) भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज नागरिकांना कोरोना लशीचे महत्व पटवून दिले. सर्वांनी कोरोनापासून बचावासाठी लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

बौद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की. कोरोना महामारीला हरवण्यासाठी आणि नागरिकांचे जीव वाचण्यासाठी लस अतिशय महत्वाची आहे. याबद्दल आपण लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांचे आभार मानायला हवेत. महामारी आल्यानंतर वर्षभरात लस तयार करणे हे मानवी दृढनिश्चयाचे प्रतिक आहे. आपल्याकडे ही लस आहे. ती सर्वांचेच जीव वाचवण्यात अतिशय मोलाची भूमिका बजावेल. 

कोरोना महामारीचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. याचबरोबर या महामारीचा आर्थिक परिणामही झाला आहे. कोरोनानंतर आपले जग पूर्वीसारखे असणार नाही. ते बदललेले असेल. पुढील काळात आपण भूतकाळातील घटना कोरोना आधीच्या आणि नंतरच्या अशा ओळखू. आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्स  आणि स्वयंसेवकांनी त्यांचा जीव धोक्यात घालून इतरांची सेवा केली आहे, असे मोदी यांनी सांगितले.  

हेही वाचा : जगात भारतातच म्युकरमायकोसिस का वाढतोय...

सध्या देशभरात कोविशिल्डसह कोव्हॅक्सिनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना ठराविक अंतरात डोस देणे गरजेचे असल्याने बहुतेक राज्यांनी दुसऱ्या डोससाठी प्राधान्य दिले जात आहे. तर काही राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची लसीकरण थांबवले आहे. अनेक कंपन्यांनी थेट राज्यांना लस पुरवठा करण्यास नकार दिला आहे. अनेक राज्यांनी ग्लोबल टेंडर काढूनही त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. 

जगातील सर्वांत मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांवरील सर्व रुग्णांना लस देण्यास सुरवात झाली. आता चौथ्या टप्प्यात 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख