गुड न्यूज : भारतीयांना वर्षाअखेर मिळणार कोरोनावरील लस - vaccine on covid 19 will be available from year end said union health minister harsh vardhan | Politics Marathi News - Sarkarnama

गुड न्यूज : भारतीयांना वर्षाअखेर मिळणार कोरोनावरील लस

मंगेश वैशंपायन
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत भारतीयांना दिलासा देणारी बातमी अखेर आली आहे. 

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा कहर वाढत असून, यामुळे धास्तावलेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी अखेर आली आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआर) व भारत बायोटेक यांनी कोरोना महामारीवर बनविलेल्या कोव्हॅक्सीन लसीच्या मानवी चाचणीचे परिणाम समाधानकारक असून, या वर्षाअखेर अथवा 2021 च्या पहिल्या तिमाहीत ही लस देशवासीयांना मिळणार आहे. 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज ही माहिती दिली. ते म्हणाले की, जगातील अनेक देशांमध्ये कोरोनावरील लशीच्या चाचण्या वेगाने सुरू आहेत. यातील अनेक चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. भारतात तयार होणाऱ्या तिन्ही लशींच्या चाचण्या याच वर्षाअखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसारच कोरोना लशी देशवासीयांना उपलब्ध करून दिल्या जातील. मात्र, त्याचा कालावधी कमीत कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. सरकारने यासाठी या वर्षाअखेरचे उद्दिष्ट्य समोर ठेवले आहे. 

सीरम इन्स्टिट्यूट व ऑक्सफर्ड विद्यापीठाची लसही कमीतकमी कालावधीत नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आहेत असे सांगून हर्षवर्धन म्हणाले की, कोरोनावरील लस रास्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार संबंधित कंपन्यांशी सामंजस्य करार करणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना व कोरोनायोद्ध्यांना सर्वांत आधी लसीकरण करणे गरजेचे आहे. तसेच, 65 वर्षांच्या पुढील वयोगटातील नागरिक व दाट लोकवस्तीच्या भागांतील लोकांनाही प्राधान्याने कोरोना लसीकरण करण्याचा विचार आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला कोरोना लस किती प्रमाणात मिळावी याचे दोन निकष बनविले आहेत. यातील पहिली निकष लोकसंख्या व महामारीचा फैलाव आणि दुसरा निकष हा प्राधान्यक्रम असेल, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रॅडोस घेब्रेयस यांनी दिली. महामारीच्या पहिल्या टप्प्यात पीपीई किट आणि अन्य बाबींबद्दल काही देशांनी साठेबाजी व नफेखोरीची भूमिका घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, लशीचा पुरवठा करण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या या अटी पाहता भारताचा लसीवर पहिल्या टप्प्यातच मोठा दावा रहाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.    

चाचण्या अंतिम टप्प्यात आलेल्या लसी 
ऑक्‍सफोर्ड - सीरम इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने विकसित होणारी लस 
कोव्हॅक्सीन : हैदराबादची भारत बायोटेक व आयसीएमआरच्या सहकार्यातून विकसित होणारी लस
जायकोव्ह-डी : जायडस कॅडिलाच्या लशीचीही मानवी चाचणी 

 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख