भाजपमधील गटबाजीमुळे चार महिन्यांत दोन मुख्यमंत्री 'आऊट'

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांनी राजीनामा दिला आहे.
uttrakhand chief minister tirath singh rawat resigns
uttrakhand chief minister tirath singh rawat resigns

डेहराडून : उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री तिरथसिंह रावत (Tiath Singh Rawat) यांनी राजीनामा दिला आहे. भाजपमधील (BJP) पक्षांतर्गत गटबाजीमुळे रावत यांना पायउतार व्हावे लागले आहे. रावत यांनी राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. त्रिवेंद्रसिंह रावत यांच्यानंतर चार महिन्यांतच तिरथसिंह रावत यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले आहे. 

रावत हे मागील तीन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून बसले होते. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी त्यांची पदाचा राजीनामा देण्याबाबत चर्चा केल्याची माहिती मिळत होती. पोटनिवडणुकीचा तिढा आणि सत्तारूढ भाजपमधील अंतर्गत वादामुळे चार महिन्यांतच त्यांच्या मुख्यमंत्रिपदावर टांगती तलवार आली होती. राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत रावत मुख्यमंत्रिपदी राहणार का याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. यातच राऊत यांनी दिल्लीहून उत्तराखंडमध्ये दाखल होत राज्यपालांना भेटून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. 

रावत यांना 30 जूनला पक्ष नेतृत्वाने दिल्लीत बोलावून घेतले होते. रावत हे खासदार आहेत. त्यांना मुख्यमंत्रिपदी कायम राहण्यासाठी विधानसभेवर निवडून येण्याची आवश्यकता आहे. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असून, पक्षांतर्गत मतभेदामुळे रावत यांना मार्चमध्ये मुख्यमंत्री नेमण्यात आले होते. रावत यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची वाचवण्यासाठी 10 सप्टेंबरपर्यंत विधानसभेवर निवडून जाण्याची अंतिम मुदत होती.

पोटनिवडणुकीचाही तिढा 
रावत यांच्या भवितव्याचा निर्णय निवडणूक आयोगाच्या हाती होता. निवडणूक आयोगाने मात्र, निवडणुका घेण्याबाबत सावध भूमिका घेतली होती. मार्च-एप्रिल महिन्यांत काही राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निवडणूक आयोग टीकेचा धनी बनला होता. अनेक राज्यांत पोटनिवडणुका प्रलंबित आहेत. मात्र, कोरोना संकटाच्या काळात निवडणुका घेण्यास आयोग राजी नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

रावत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी  दिल्लीत 30 जूनला सायंकाळपर्यंत चर्चा केली होती. विधानसभा पोटनिवडणुकीबाबत अनिश्चितता निर्माण झालेली असताना रावत यांच्यासमोर गटबाजीची समस्या आहे. ही समस्या त्यांच्या आधीचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनाही होती. पक्षांतर्गत वादामुळेच त्यांना पद सोडावे लागले होते. आता विद्यमान मुख्यमंत्र्यांनाही गटबाजी भोवली आहे. 

त्रिवेंद्रसिंह रावत यांनी चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी तिरथसिंह रावत यांची निवड झाली होती. पक्षांतर्गत नाराजीमुळे त्रिवेंद्रसिंह यांना पायउतार व्हावे लागले होते. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीपासून नारायणदत्त तिवारी वगळता एकाही मुख्यमंत्र्याला पदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. याला त्रिवेंदसिंहही अपवाद ठरले नव्हते. त्यांना राज्यातील अपूर्ण कार्यकाळाची प्रथा मोडून काढण्यासाठी केवळ एक वर्षाचा कालावधी राहिला होता. आता तिरथसिंह रावत यांनीही राजीनामा दिल्याने नवीन मुख्यमंत्री नेमावा लागणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com