अपशकुनी ठरणाऱ्या मुख्यमंत्री निवासात अखेर नवीन मुख्यमंत्र्यांचा गृहप्रवेश! - uttarakhand chief minister pushkar dhami moves to official cm residence-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

अपशकुनी ठरणाऱ्या मुख्यमंत्री निवासात अखेर नवीन मुख्यमंत्र्यांचा गृहप्रवेश!

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जुलै 2021

या निवासस्थानात राहणारा मुख्यमंत्री त्याचा कार्यकाळ पूर्ण करीत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे आधीच्या मुख्यमंत्र्यांनी तेथे राहण्यास जाणे टाळले होते.  

डेहराडून : उत्तराखंडचे (Uttarakhand) माजी मुख्यमंत्री तिरथसिंह रावत (Tiath Singh Rawat) यांनी यांनी त्यांच्या चार महिन्यांच्या कार्यकाळात शासकीय मुख्यमंत्री निवासात पाऊल टाकले नव्हते. या निवासात राहणारा मुख्यमंत्री त्याचा कार्यकाळ पूर्ण करीत नाही, असे यामागे कारण होते. आता नवीन मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी (Pushkar Singh Dhami) हे मात्र, याच निवासस्थानात राहण्यास गेले आहेत. 

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान अपशकुनी मानले जाते. तेथे राहणारा मुख्यमंत्री कधीही कार्यकाळ पूर्ण करीत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे आधीचे मुख्यमंत्री तिरथसिंह रावत हे चार महिन्यांच्या कार्यकाळात त्या निवासस्थानात गेले नव्हते. आता नवीन मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी मात्र, या परंपरेला छेद दिला आहे. त्यांनी याच निवासस्थानाची निवड केली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानात राहण्यास जाण्यापूर्वी तेथे धार्मिक पूजा केली. कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून हे निवासस्थान मुक्त व्हावे यासाठी तेथे वास्तूशास्त्रानुसार काही दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. तिरथसिंह रावत यांनी मुख्यमंत्री असताना या निवासस्थानाचे रुपांतर कोविड केअर सेंटरमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता. सुमारे 10 एकर परिसरावर हे निवासस्थान आहे. धामी यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर त्यांनी रावत यांचा आधीचा निर्णय रद्द करुन त्या निवासस्थानात राहण्यास जाण्याचा निर्णय घेतला.

उत्तराखंडमधील मुख्यमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाला होता. पक्षांतर्गत वाद आणि कोरोनामुळे विधानसभा पोटनिवडणुका होणार नसल्यामुळे खासदार असलेल्या तिरथसिंह रावत यांना विधानसभेवर निवडून जाणे शक्य नव्हते. यामुळे अखेर रावत यांनी चार महिन्यांतच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर धामी हे मुख्यमंत्री झाले. धामी हे 45 वर्षांचे आहेत. ते उत्तराखंडचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरले आहेत. धामी हे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या जवळचे मानले जातात. 

राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहेत. तोपर्यंत मुख्यमंत्री कोण नेमावा, असा तिढा नेतृत्वामसोर होता. सुमारे अर्धा डझन आमदार मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक होते. यात चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेले त्रिवेंद्रसिंह रावत यांच्याबरोबर सत्पाल महाराज, धनसिंह रावत आणि पुष्करसिंह धामी यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. अखेर धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. 

हेही वाचा : आसाम-मिझोराम सीमेवरील हिंसाचारास अमित शहाच जबाबदार 

त्रिवेंद्रसिंह रावत यांनी चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी तिरथसिंह रावत यांची निवड झाली होती. पक्षांतर्गत नाराजीमुळे त्रिवेंद्रसिंह यांना पायउतार व्हावे लागले होते. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीपासून नारायणदत्त तिवारी वगळता एकाही मुख्यमंत्र्याला पदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. याला त्रिवेंदसिंहही अपवाद ठरले नव्हते. त्यांना राज्यातील अपूर्ण कार्यकाळाची प्रथा मोडून काढण्यासाठी केवळ एक वर्षाचा कालावधी राहिला होता. आता तिरथसिंह रावत यांनीही राजीनामा दिल्याने नवीन मुख्यमंत्री नेमावा लागला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख