अजब कारभार...पहिला डोस कोव्हॅक्सिनचा तर दुसरा डोस कोव्हिशिल्डचा! - uttar pradesh man is first given covaxin dose and after covishield dose | Politics Marathi News - Sarkarnama

अजब कारभार...पहिला डोस कोव्हॅक्सिनचा तर दुसरा डोस कोव्हिशिल्डचा!

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 एप्रिल 2021

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणाचा वेग वाढवला आहे. आता एका रुग्णालयात पहिला आणि दुसरा डोस वेगवेगळ्या लशीचा देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणाचा वेग वाढवला आहे. कोरोनाच्या संकटात सगळ्याच व्यवस्थेवर ताण येत असल्याने रोज नवनवीन धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले आहेत. आता एका व्यक्तीने आधी कोव्हॅक्सिनचा डोस घेतलेला असताना त्याला दुसरा डोस मात्र, कोव्हिशिल्डचा देण्यात आला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथे घडली आहे. 

महाराजगंजचे मुख्य विकास अधिकारी गौरवसिंह सोगरवाल यांचे चालक उमेश यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. सोगरवाल यांचे तीन चालक कोरोना लशीचा दुसरा डोस घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते. उमेशने कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. परंतु, त्याला कोव्हॅक्सिनऐवजी कोव्हिशिल्ड लशीचा दुसरा डोस देण्यात आला. ही बाब त्याच्या लक्षात आली. त्यानंतर इतर दोन चालकांना दुसरा डोस देण्यात आला नाही. याबाबतने उमेशने तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. 

याविषयी बोलताना मुख्य वैद्यकीय अधिकारी ए.के.श्रीवास्तव म्हणाले की, कोरोना लशीचे दोन वेगवेगळे डोस दिल्यानंतर अद्याप तरी दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. असे असले तरी हा प्रकार घडायला नको होता. आता सर्व कर्मचाऱ्यांना आधी दिलेल्या लशीचाच दुसरा डोस देण्याची सूचना करण्यात आली आहे. 

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, मागील 24 तासांत तब्बल दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात 7 एप्रिलपासून दररोज लाखाच्या वर नवीन रुग्ण सापडत आहेत. याचवेळी देशात कोरोना लशीची टंचाई निर्माण झाली आहे. यावरुन केंद्र सरकार आणी काही राज्यांमध्ये जुंपली आहे. 

देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख