खबरदार : रेमडेसिव्हिरचा काळा बाजार करणाऱ्यांवर आता 'रासुका' - uttar pradesh government will invoke nsa against black marketeer of remdesivir | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

खबरदार : रेमडेसिव्हिरचा काळा बाजार करणाऱ्यांवर आता 'रासुका'

वृत्तसंस्था
बुधवार, 21 एप्रिल 2021

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. मागील 24 तासांत सुमारे 3 लाख नवीन रुग्ण सापडले आहेत. 

लखनौ : देशात कोरोनाचा उद्रेक झाला असून, रुग्णसंख्या अतिशय वेगाने वाढत आहे. याचा फायदा घेऊन कोरोना रुग्णांसाठीच्या रेमडेसिव्हिरसारखे इंजेक्शन व औषधांचा काळा बाजार जोरात सुरू आहे. याला आळा घालण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाऊल उचलले आहे. आता काळा बाजार करणाऱ्यांवर थेट राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातंर्गत (रासुका) कारवाई होणार आहे. 

उत्तर प्रदेशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. यामुळे उच्च न्यायालयाने राज्यातील पाच शहरांत लॉकडाउन लावण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. राज्य सरकारने याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. राज्य सरकारने कडक लॉकडाउनला विरोध केला असला तरी वीकएंड लॉकडाउन लागू केला आहे. 

राज्यातील वाढत्या कोरोना संकटाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी आज बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी उत्तर प्रदेशात लॉकडाउन लावण्याचे नियोजन नसल्याचे स्पष्ट केले. या वेळी बोलताना ते म्हणाले की, सर्व ऑक्सिजन प्रकल्पांमधून पारदर्शक पद्धतीने ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. ऑक्सिजन प्रकल्पाला पुरेशी सुरक्षाव्यवस्था पुरविण्यासोबत ऑक्सिजन टँकरला जीपीएस उपकरण लावण्यात येणार आहे. 

रेमडेसिव्हिरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी त्याच्या खरेदीवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. सर्व रुग्णालयांनी उपलब्ध खाटांची माहिती सार्वजनिक डॅशबोर्डवर नियमितपणे अद्ययावत करणे आवश्यक आहे. याचबरोबर रुग्णालयांनी ऑक्सिजन साठ्याचेही मूल्यमापन करावे. उत्तर प्रदेशात औषधे अथवा ऑक्सिजनचा अद्याप तरी तुटवडा नाही, असे आदित्यनाथ यांनी सांगितले. 

रेमडेसिव्हिर आणि फॅबीफ्लू यासारख्या औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत. अशा गुन्ह्यांत सहभागी असणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणि गुंडा कायद्यातंर्गत गुन्हे नोंदविण्यात येणार आहे, असेही आदित्यनाथ यांनी नमूद केले.  

राज्यात उद्यापर्यंत (ता. २२) 10 हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होतील. राज्यासाठी प्रतिदिन ५० हजार इंजेक्शनची मागणी नोंदविण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान २०० खाटा वाढविण्यात येणार आहेत. इतर राज्यांतून येणाऱ्यां स्थलांतरितांना  किमान दोन आठवडे विलगीकरणात ठेवावे, असे आदित्यनाथ यांनी सांगितले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख