उत्तराखंडचा फॉर्म्युला उत्तर प्रदेशात? योगींना बदलण्याची चर्चा अन् दिल्लीत मॅरेथॉन बैठका - uttar pradesh cm yogi adityanath meets prime minister narendra modi | Politics Marathi News - Sarkarnama

उत्तराखंडचा फॉर्म्युला उत्तर प्रदेशात? योगींना बदलण्याची चर्चा अन् दिल्लीत मॅरेथॉन बैठका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 जून 2021

उत्तर प्रदेशमधील भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. पक्षाचे अनेक आमदार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामावर नाराज आहेत. 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) भाजपमध्ये (BJP) दुफळी निर्माण झाली आहे. पक्षाचे अनेक आमदार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या कामावर नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तराखंडची (Uttarakhand) पुनरावृत्ती उत्तर प्रदेशात घडणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातच योगींना दिल्लीत दाखल होऊन पक्ष नेतृत्वासोबत मॅरेथॉन बैठका सुरू केल्या आहेत. आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांचीही भेट घेतली. यामुळे उत्तर प्रदेशात योगी राहणार की जाणार याबद्दल चर्चा सुरू झाली  आहे. 

योगी आदित्यनाथ यांनी काल (ता.10) केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सुमारे 90 मिनिटे भेट घेतली. आज त्यांनी पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. पंतप्रधान मोदी आणि योगी यांची भेट सुमारे तासभर चालली. यानंतर लगेचच ते नड्डांच्या निवासस्थानी रवाना झाले. योगींच्या मॅरेथॉन बैठकांमुळे उत्तर प्रदेशसह दिल्लीतील राजकारण ढवळून निघाले आहे. 

मोदींची भेट घेतल्यानंतर योगींनी ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, मला आज आदरणीय पंतप्रधान मोदींना भेटण्याची संधी मिळाली. याचबरोबबर त्यांचे मार्गदर्शनही लाभले. त्यांनी त्यांच्या व्यग्र दिनक्रमातून माझ्यासाठी वेळ काढल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.  

हेही वाचा : भाजप प्रवेशाबाबत कपिल सिब्बल म्हणाले, मेलो तरी नाही! 

पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होत आहेत. यातच पक्षांतर्गत योगींबद्दल नाराजी वाढत आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी भाजपचे सरचिटणीस बी.एल.संतोष यांनी उत्तर प्रदेशला भेट दिली होती. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी नाराज नेत्यांची भेट घेतली होती. 

उत्तराखंडमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्याबद्दल सत्तारूढ भाजपच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी होती. पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आल्याने रावत यांना बदलण्यात आले होते. रावत यांच्या जागी तीरथसिंह रावत यांची निवड पक्षाने केली होती. पक्षातील नाराज नेत्यांची दखल घेऊन नेतृत्वाने हा निर्णय घेतला होता. आता उत्तराखंडची पुनरावृत्ती उत्तर प्रदेशात होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहेत. काही भाजप नेतेच उत्तराखंडचे उदाहरण खासगीत देऊन हाच फॉर्म्युला उत्तर प्रदेशात राबवावा, अशी मागणी करीत आहेत.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख