भाजपच्या दोन बड्या नेत्यांच्या मुलांनी वाढवली फडणवीसांची डोकेदुखी

विधानसभा निवडणुकीआधी गोव्यात भाजपमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.
Devendra Fadnavis, Manohar Parrikar and Sripad Naik
Devendra Fadnavis, Manohar Parrikar and Sripad Naik Sarkarnama

पणजी : गोव्यात (Goa) पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे (Assembly Election) राजकारण पेटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील (BJP) मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक (Siddhesh Naik) यांनी भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे गोव्याचे भाजप प्रभारी आहेत. त्यामुळे यातून मार्ग काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहेत.

भाजपच्या बड्या नेत्यांच्या मुलांनी जाहीरपणे पक्षाकडे मागणी केल्याने पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. उत्पल पर्रीकर आणि सिद्धेश नाईक यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, असा सूर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आहे. मात्र, या दोघांनी दावा केलेल्या मतदारसंघातील विद्यमान आमदारांचे काय करायचे, असा प्रश्न भाजप नेतृत्वाला पडला आहे. उत्पल आणि सिद्धेश यांनी उमेदवारी दिल्यास दोन्ही मतदारसंघात बंडखोरीचा फटका बसण्याचा धोकाही भाजपला आहे. यावर आता फडणवीसांसह गोव्यातील पक्ष नेतृत्वाला निर्णय घ्यावा लागणार आहे.

श्रीपाद नाईक हे पर्यटन खात्याचे राज्यमंत्री आहेत. ते गोव्यातील भाजपचे वजनदार नेते मानले जातात. त्यांचे पुत्र सिद्धेश यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. सिद्धेश नाईक यांनी म्हटले आहे की, मी 2003 पासून पक्षाचे काम करीत आहे. पक्षाच्या अनेक पदांची जबाबदारी मी सांभाळली आहे. कम्बारजुआ मतदारसंघाचा मी अध्यक्षही होतो. पक्षाच्या तिकिटावर जिल्हा परिषद मोठ्या मताधिक्याने जिंकली आहे.

Devendra Fadnavis, Manohar Parrikar and Sripad Naik
काँग्रेसची ताकद वाढली..अपक्ष आमदारांनी हातात घेतला हात!

पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होते तसेच, संरक्षण मंत्रीही होते. त्यांच्या मृत्यूने गोव्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. पर्रीकर हे तब्बल 25 वर्षे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. आता मतदारसंघावर त्यांचे पुत्र उत्पल यांनी दावा सांगितला आहे. पणजीत मागील दोन महिन्यांपासून ते प्रचार करीत आहेत. त्यांनी मागील आठवड्यात पक्ष नेतृत्वाला थेट धमकीवजा इशारा दिला आहे. आता मागे वळून पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे गोवा भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Devendra Fadnavis, Manohar Parrikar and Sripad Naik
पर्रीकरांच्या मुलाचा भाजपला पहिला झटका! पणजीत आमदारांनी थांबवला प्रचार

पणजीच्या जागेवर सध्या बाबूश मोन्सेरात (Babush Monserrate) आहेत. मोन्सेरात यांनी 2017 मध्ये विधानसभा निवडणूक तेथून लढवली होती परंतु, त्यांचा पराभव झाला होता. नंतर 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या 10 नेत्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. नंतर पर्रीकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांनी पणजीवर विजय मिळवला होता. ते आता जागेवर पुन्हा दावा सांगत आहेत. याला उत्पल पर्रीकर यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे उत्पल यांनी मोर्चेबांधणी करीत पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे. यासाठी त्यांनी नुकतीच पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचीही भेट घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com