Corona Alert : भारतातून अमेरिकी नागरिकांनी तातडीने मायदेशी परतावे; अमेरिकेची सूचना - us says citizens should return from india as soon as possible due to covid crisis | Politics Marathi News - Sarkarnama

Corona Alert : भारतातून अमेरिकी नागरिकांनी तातडीने मायदेशी परतावे; अमेरिकेची सूचना

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 एप्रिल 2021

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. मागील 24 तासांत जगामध्ये भारतात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. 

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 3 लाख 79 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 645 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात रुग्णसंख्या वाढल्याने रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागली आहेत. यामुळे भारतातील अमेरिकी नागरिकांनी तातडीने मायदेशी  परतावे, अशी सूचना अमेरिका सरकारने केली आहे. 

अमेरिकेच्या गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतात कोरोना संकट वाढू लागले आहे. त्यामुळे अमेरिकी नागरिकांनी भारतात प्रवास करु नये. सध्या भारतात असलेल्या अमेरिकी नागरिकांनी शक्य असल्यास तातडीने मायदेशी परतावे. सध्या  भारत आणि अमेरिका यांच्यात 14 थेट विमान उड्डाणे सुरू आहेत. तसेच, युरोपमार्गेही अमेरिकेत येणारी उड्डाणेही सुरू आहेत. 

भारतातील सक्रिय रुग्णांची संख्या 30 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 30 लाख 84 हजार 814 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 16.79 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 82.10 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 50 लाख 86 हजार 878 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.11 टक्के आहे. 

हेही वाचा : भारतात दर तासाला 151 जणांचा कोरोनामुुळे मृत्यू 

भारतातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 83 लाख 76 हजार 524 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 4 हजार 832 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 79 हजार 257 रुग्ण सापडले असून, 3 हजार 645 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख