गुड न्यूज : आता 12 वर्षांवरील मुलांनाही मिळणार कोरोनावरील लस - US approves covid vaccine pfizer shot fo kids above 12 years | Politics Marathi News - Sarkarnama

गुड न्यूज : आता 12 वर्षांवरील मुलांनाही मिळणार कोरोनावरील लस

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 मे 2021

जगभरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे. 

वॉशिंग्टन : जगभरात कोरोना (covid19) संसर्गाची दुसरी लाट आली असून, रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. यामुळे लसीकरणावर (covid vaccination) भर दिला जात आहे. अमेरिकेत (US) प्रौढांसाठी  फायझरच्या (pfizer) कोरोना लशीचा वापर केला जात आहे. आता 12 वर्षांवरील मुलांसाठी या लशीचा वापर करण्यास अमेरिकेने मंजुरी दिली आहे. (US approves covid vaccine pfizer shot fo kids above 12 years)

जगभरातील बहुतांश कोरोना लशींना या प्रौढांसाठी आहेत. फायझरची दोन डोसची लस मात्र, अनेक देशांमध्ये 16 वर्षांवरील मुलांसाठी देण्यात येत आहे. कॅनडाने या लशीचा वापर 12 वर्षांवरील मुलांसाठी करण्यास नुकतीच परवानगी दिली आहे. आता अमेरिकेनेही याला मंजुरी दिली आहे. कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर शाळा सुरू होणार आहेत. याआधी मुलांना लस देऊन त्यांची प्रतिकारक्षमता वाढावी, असे नियोजन सरकारने केले आहे. 

अमेरिकेत शाळा, पालक आणि आरोग्य अधिकारी मुलांसाठी लशीला परवानगी मिळावी, यासाठी प्रतीक्षा करीत होते. हे लसीकरण गुरुवारपासून सुरू होणार आहे. लसीकरण सल्लागार समितीने 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना ही लस देण्याची शिफारस केली आहे. याबाबतची घोषणा लवकरच होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : कोरोना लसीकरणासाठी आधार आवश्यक आहे का...

कोरोना विरुद्धच्या लढ्यात हे अतिशय महत्वाचे पाऊल ठरणार आहे, असे फायझरचे वरिष्ठ उपाध्यक्ष व बालरोगतज्ञ डॉ.बिल ग्रुबर म्हणाले. फायझरच्या लशीच्या 12 ते 15 वयोगटातील 2 हजार मुलांवर करण्यात आलेल्या चाचणीत ती सुरक्षित आणि कोरोनापासून अधिक चांगल्या पद्धतीने बचाव करणारी असल्याचे समोर आले आहे, असे अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाने म्हटले आहे. या लशीचे दोन्ही डोस दिलेल्या मुलांमध्ये कोरोना संसर्ग आढळला नाही. या लशीमुळे मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज तयार झालेल्या आढळून आल्या आहेत. 

अमेरिकेत प्रौढांचे लसीकरण बऱ्यापैकी झाले असले तरी लहान मुलांच्या लसीकरणाचे काय हा प्रश्न निर्माण झाला होता. कोरोनाचा कहर संपल्यानंतर मुलांना शाळेत कसे पाठवायचे, असा प्रश्न पालकांसमोर उपस्थित झाला होता. आता फायझरच्या लशीला लहान मुलांसाठी परवानगी देण्यात आल्याने हा प्रश्न सुटला आहे. लवकरच आता 12 वर्षांवरील मुलांसाठी लसीकरण सुरू होणार आहे. 

भारतात 18 वर्षांवरील सर्वांना लस 
सध्या भारतात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख