सर्वसमावेशक राजकारणाचं चालतं बोलतं विद्यापीठ... - The university speaks of inclusive politics | Politics Marathi News - Sarkarnama

सर्वसमावेशक राजकारणाचं चालतं बोलतं विद्यापीठ...

महेश जगताप 
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

विलासरावांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं दांडगा जनसंपर्क. व सर्वसामान्य माणसाचा त्यांचा असणारा संवाद.

पुणे : कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना लातूर जिल्ह्यातील बाभळगाव या खेड्यातील सरपंच ते महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री ,केंद्रीय मंत्री असा प्रवास असलेले तरीही आपलं पायघट्ट जमिनीत रोवून सर्वसामान्यांच्या कामासाठी तत्पर असलेले व अनेक राजकीय कार्यकर्त्यासाठी उमेद, शालीन, सर्वसमावेशक राजकारणाचं चालतं बोलतं विद्यापीठ असणारे विलासराव देशमुख यांचा आज स्मृतिदिन.
 
या नेत्याला जाऊन आज आठ वर्षे पूर्ण होत आहेत. तरीही या महाराष्ट्रातील जनतेला आपल्या नेत्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. विशेषतः काँग्रेस  पक्षाला विलासराव देशमुख यांची आज मोठी उणीव भासत आहे. आज तरी या पक्षाकडे या उंचीचा नेता महाराष्ट्रात सापडत नाही. त्यामुळेच कॉंग्रेस पक्षांची हेळसांड झालेली आपणाला त्यांच्या मृत्युनंतर दिसून येते.

विलासरावांच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच झाले. ते पुढे पुणे शहरात उच्च शिक्षण घेण्यासाठी आले मग त्यांनी गरवारे कॉलेजमधून बी. एस्सी पदवी मिळवली. पुण्याच्या लॉ कॉलेजमधून एल.एल.बी पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी शिवाजीराव दुर्वे या सुप्रसिद्ध वकिलाकडे त्यांनी पुण्यात वकिलीस सुरुवात केली. काही काळ पुण्यात राहिल्यानंतर 1971 मध्ये ते गावाकडे परतले. तिथल्या न्यायालयात वकिली करत असताना सर्व मंडळीही परिचयाची तेव्हा कोणाला फी मागायची असा त्यांना प्रश्न पडे. त्यामुळे न्यायालयातील कामे अशी ही कुणाची न फी घेताच आपण करतो तर मग आपण सामाजिक कामे मोफत केली तर अधिक चांगल नाही का असा विचार करून विलासराव सामाजिक कामाकडे वळले.

लातूर येथून 1980 मध्ये प्रथमच महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले व त्याच मतदारसंघातून 1985 आणि  1990 मध्ये पुन्हा निवडून आले. ते लवकरच मराठवाडा भागातील कॉंग्रेसचे लोकप्रिय नेते झाले. पण याच मतदार संघात १९९५ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला पराभव त्यांच्या फार जिव्हारी लागला होता. त्यावेळी त्यांच्या विधान परिषदेवर घेतले जावे, या मागणीला पक्षाने प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे काही काळ पक्षावर नाराज होऊन काही दिवस पक्षापासून वेगळेही झाले होते. पण लगेच मतभेद विसरून कामाला लागले. आणि 1999च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी होऊन त्यांच्याच गळ्यात काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली. त्यानंतर 2003 मध्ये अचानक देशमुख यांचे मुख्यमंत्रीपद काढून घेण्यात आले. पण 2004च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांच्याकडेच पद सोपवण्यात आले. 

देशमुख यांच्या काळातील सर्वात मोठी घटना म्हणजे 2008 झाली. मुंबई शहरावर झालेला अतिरेक्यांचा हल्ला. यावेळी अत्यंत नेटाने आणि संयमाने त्यांनी परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यामध्ये आपले मुख्यमंत्रीपद राखता आले नाही. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात अनेक जनसामान्यांसाठी योजना राबवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे व त्यांना गरिबीतून वर काढण्याच प्रयत्न विलासराव यांनी केलेला आपणाला दिसून येतो. त्याचबरोबर राज्यातील उद्योग, सेवा क्षेत्र , पायाभूत सुविधा वाढवून महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकाचे राज्य असले पाहिजे, असा त्यांचा कायम आग्रह असायचा. व त्या दृष्टीने अनेक त्यांनी आपल्या कार्यकाळात निर्णय घेतले व त्याची अंमलबजावणीही केली.
 
विलासरावांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं दांडगा जनसंपर्क. व सर्वसामान्य माणसाचा त्यांचा असणारा संवाद. त्याचेच एक उदाहरण म्हणजे लातूरमध्ये एका इमारतीला आग लागली होती. त्यावेळी लातूर शहरातील एका नागरिकाने थेट विलासराव यांना फोन केला या ठिकाणी आग लागली आहे म्हणून सांगितले. त्यावेळी विलासरावांनी लगेच स्थानिक प्रशासनाला कल्पना देऊन ताबडतोफ त्या ठिकाणी जाऊन आग  विझवण्यास  सांगितले. ही घटना येथील स्थानिक प्रशासनाला ही माहिती नव्हती पण विलासरावांनी त्यांना कल्पना दिल्यानंतर झालेली घटना माहीत झाली. अशी अनेक उदाहरणे विलासरावांच्या बाबतीत घडली आहेत. 

संबंधित लेख