केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचा कोरोनामुळे मृत्यू - Union Minister of State for Railways Suresh Angadi passes away | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचा कोरोनामुळे मृत्यू

वृत्तसंस्था
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

देशभरात कोरोनाचा कहर वाढला असून, रुग्णसंख्या विक्रमी वेगाने वाढत आहे. देशात 90 हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना 11 सप्टेंबरला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना दिल्लीतील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले होते. एम्समध्ये आज उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.  

कोरोनामुळे मृत्यू झालेले ते कर्नाटकातील दुसरे संसद सदस्य आहेत. याआधी खासदार अशोक गस्ती यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. अंगडी यांना कोरोना झाल्याचे निदान 11 सप्टेंबरला झाले होते. बेळगाव मतदारसंघाचे खासदार असलेल्या अंगडी यांनी त्यावेळी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोणतीही लक्षणे दिसल्यास कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले होते. प्रकृतीची काळजी घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी सर्वांना केली होती. अंगडी यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांच्या मृत्यू झाला. 

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सुरुवातीला गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या महिन्याच्या सुरवातीला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी पॉझिटिव्ह सापडले होते. याचबरोबर केंद्रीय कृषी राज्य मंत्री कैलाश चौधरी, आयुष मंत्री श्रीपाद नाईक, जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल हे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.  

सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाआधी खासदारांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. यात अनेक खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोना झालेल्या खासदारांना अधिवेशनात प्रवेश दिला जात नाही. गडकरी यांनी अधिवेशनला हजेरी लावल्यानंतर  ते पॉझिटिव्ह सापडल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर नेत्यांना खबरदारीचे उपाय घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख