महेश लांडगेंची २०१९ ची इच्छा २०२४ मध्ये पूर्ण होणार?

केंद्रीय मंत्री रेणूकासिंह यांच्या दौऱ्यात महेश लांडगे (Mahesh Landge) सक्रीय आहेत
Renuka Singh
Renuka Singhsarkarnama

पिंपरी : भोसरीचे भाजप (BJP) आमदार आणि पक्षाचे पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहर अध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या गेल्या वाढदिवसाला भावी खासदार म्हणून त्यांचे बॅनर्स संपूर्ण शिरूर (Shirur) लोकसभा मतदारसंघात लागले होते. त्यातून २०१९ लाच लोकसभेचे उमेदवार अशी चर्चा झालेल्या आमदार लांडगेंनी २०२४ च्या लोकसभेची तयारी सुरु केल्याची चर्चा झाली होती.

शिरूर मतदारसंघात २०२४ मध्ये भाजपच्या विजयाची जबाबदारी सोपविलेल्या केंद्रीय आदीवासी राज्यमंत्री रेणूकासिंह यांच्या? 'शिरूर' दौऱ्यातून ती पुन्हा सुरु झाली आहे. कारण या दौऱ्याचे बहूतांश नियोजन लांडगेंनीच केले असून ते सुरुवातीपासून हिरीरीने त्यात सहभागीही झालेले आहेत.

शिरूरमध्ये २०२४ ला कमळ फुलले पाहिजे, येथे विकास हवा असेल, तर खासदारही भाजपचा हवा, असे रेणूकासिंह यांनी आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात पहिल्या दिवशी काल (ता.१४) रात्री मंचर येथे पत्रकारपरिषदेत सांगितले. त्यामुळे तेथून २०२४ ला तयारीत असलेले या मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao Adharao Patil) यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची धाकधूक आणखी वाढली आहे. कारण त्याअगोदर दोन दिवसांपूर्वीच या मतदारसंघाच्या भाजप प्रभारी आणि पुण्यातील पक्षाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनीही २०२४ मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघात निश्चितपणे भाजपचा उमेदवार निवडून येणार, असा दावा केला होता.

Renuka Singh
खासदार कोल्हेंना त्यांच्या कार्यालयाकडे जाणारा रस्ताही करता आला नाही : केंद्रीय मंत्र्यांची टीका

त्यामुळे शिवसेनेकडून खासदारकीची तेथे हॅटट्रिक केलेले व आता शिंदे गटात गेलेले आढळराव यांचे काय होणार अशी चर्चा मतदारसंघात सुरु झाली होती. तिला काल आणखी बळ मिळाले. २०१९ लाच शिरूरमधून लांडगेंच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, शिवसेना, भाजप युतीमुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार आढळराव यांना तिकिट मिळाले. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळरावांचा खासदारकीचा चौकार त्यावेळी हुकविला. तरीही पुन्हा २०२४ ला निवडणूक लढविण्याच्या तयारीला ते लागले आहेत.

दरम्यान, युती तुटली. परिणामी भाजपने शिरूरमध्ये कमळ फुलविण्याचा निश्चय केला आहे. त्यातून लांडगे यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. कारण विद्यमान खासदारांच्या तोडीचा व निवडून येईल असा दुसरा उमेदवार तूर्त भाजपकडे नाही. ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात त्यांना क्रीडा तथा युवक राज्यमंत्री पद मिळण्याची चर्चा सध्या आहे. शिरूरमधील सहा मतदारसंघात फक्त तेच एकटे भाजपचे आमदार आहेत. त्यांचा संपर्क खेड, शिरूर, आंबेगाव व जुन्नर या शिरूर मतदारसंघाच्या टोकापर्यंत आहे.

Renuka Singh
पवारांचा सल्ला सत्ताधारी-विरोधक ऐकणार का?

पक्षाने लोकसभेला संधी दिली, तर तशी तयारीही त्यांनी यापूर्वीच दाखवलेली आहे. मतदारसंघातच नाही, तर पुणे जिल्ह्यासह राज्यात आकर्षणाचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यती सुरु होण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पाठपुरावा केलेला आहे. कार्यकर्त्यांचे मोठे जाळे त्यांच्याकडे आहे. त्याच्या जोरावरच ते २०१४ ला अपक्ष म्हणून भोसरीतून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते.

पक्षाचा खासदार नसलेल्या देशातील १४४ जागा २०२४ ला जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यात शिरूर, बारामतीसह महाराष्ट्रातील १६ मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघाची जबाबदारी पक्षाच्या मंत्र्यांकडे देण्यात आली असून ते सध्या तेथे दौऱ्यावर आहेत. त्याअंतर्गत रेणूकासिंह कालपासून शिरूरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आल्या आहेत. त्यात लांडगे पहिल्यापासून सामील झालेले आहेत. त्यांनी रेणूकासिंह यांचे विमानतळावर उतरताच स्वागत केले.

Renuka Singh
केंद्रीय मंत्री रेणुका सिंहांच्या दाव्याने आढळराव पाटलांची धाकधूक वाढली

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजना शिरूर मतदारसंघातील जनतेपर्यंत प्रामाणिकपणे पोचवल्या, तरी शिरूरला विजय निश्चीत आहे, असा दावा रेणूकासिंह यांनी पहिल्या दिवसाच्या पहिल्याच बैठकीत भोसरीत काल केला. त्यांचे काल पहिल्या दिवसांतील कार्यक्रम संपेपर्यंत लांडगे त्यांच्याबरोबरच होते. आज व उद्याही ते त्यांच्यासोबतच राहणार आहेत. त्यांचा हा सक्रिय सहभाग पाहता तेच २०२४ ला भाजपचे शिरूरमधील उमेदवार असतील, अशी चर्चा त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात रंगलेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com