केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची प्रकृती चिंताजनक - union minister ram vilas paswan admitted to fortis escorts hospital | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची प्रकृती चिंताजनक

वृत्तसंस्था
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान यांची प्रकृती ढासळली असून, त्यांना फोर्टिस एर्स्कॉर्ट्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख व केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर फोर्टिस एर्स्कॉर्ट्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला असून, त्यांचे मूत्रपिंडही निकामी झाले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. 

पासवान यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पासवान यांची प्रकृती स्थिर असली तरी ते बारकाईने त्यांच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पासवान यांना आधीपासून हृदयविकाराचा त्रास आहे. त्यांची 2017 मध्ये हृदय शस्त्रक्रिया झाली होती. लंडनमध्ये झालेल्या या शस्त्रक्रियेत त्यांच्या हृदयातील सदोष व्हॉल्व हा दुसरे उपकरण बसवून दुरुस्त करण्यात आला होता. याचबरोबर आधी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. 

पासवान यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा झालेली नाही. त्यांना आधीपासून हृदयविकार असल्याने त्यांचे हृदय कमजोर झाले आहे. यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणेही शक्य नाही, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. 

मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पासवान यांच्याकडे धान्य पुरवठा आणि ग्राहक तक्रार निवारण मंत्रालयाची जबाबदारी आहे. पासवान यांचा बिहारमधील लोक जनशक्ती पक्ष हा तेथे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे संयुक्त जनता दल आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी आहे. पासवान यांनी मागील 32 वर्षांत 11 वेळा निवडणूक लढविली असून, ते 7 वेळा जिंकले आहेत. याचबरोबर त्यांनी केंद्रात सातवेळा मंत्री म्हणून काम केले आहे. बिहारमधील हाजीपूर लोकसभा मतदारसंघाचे अनेकवेळा प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे. सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत. हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांचे बंधू पशूपति कुमार पारस हे खासदार आहेत. 

सध्या बिहारमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात पुन्हा एकदा जेडीयू, भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष एकत्रितरीत्या निवडणूक लढणार आहेत. राज्यातील पक्षाची धुरा पासवान यांचे पुत्र चिराग पासवान हे सांभाळत आहेत. मागील काही काळापासून चिराग पासवान आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करीत आहेत. यामुळे राज्यातील सत्ताधारी आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख