चिराग पासवान यांच्या विरोधात भाजपकडून जावडेकर, भूपेंद्र यादव मैदानात - union minister prakash javdekar targets ljp president chirag paswan | Politics Marathi News - Sarkarnama

चिराग पासवान यांच्या विरोधात भाजपकडून जावडेकर, भूपेंद्र यादव मैदानात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. लोक जनशक्ती पक्षाने सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्षाने (एलजेपी) मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोध करीत बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून  (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याचवेळी देश पातळीवर भाजपला पाठिंबा कायम राहील, अशी भूमिका एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी घेतली आहे. यामुळे ही भाजपचीच खेळी असल्याचीच चर्चा सुरू झाली आहे. यावर भाजपने आता आक्रमक पावले उचलली आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता अनेक भाजप नेते एलजेपीमध्ये प्रवेशासाठी गर्दी करु लागले आहेत. यातील बहुतांश नेत्यांचे मतदारसंघ हे जागावाटपात एनडीएकडे गेले आहेत. भाजप नेते पक्षांतर करीत असताना भाजप नेतृत्व याकडे काहीच घडत नसल्याप्रमाणे पाहत आहे. तसेच, यावर काही प्रतिक्रियाही देताना दिसत नाही. नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील, असे भाजप म्हणत आहे. याचवेळी भाजपकडून जेडीयूच्या विरोधात राजकारण सुरू आहे. 

चिराग पासवान हे स्वतंत्रपणे लढणार असून, ते जेडीयूच्या विरोधात उमेदवार उभे करणार आहेत. यामुळे ते प्रामुख्याने जेडीयूची मते खातील. मात्र, ते भाजपला पाठिंबा देणार आहेत. यामुळे भाजपला फायदाच होणार आहे. याचवेळी जेडीयूकडे जागावाटपात गेलेल्या मतदारसंघांतील नेते एलजेपीमध्ये जात आहेत. यामुळे या सगळ्या घटनाक्रमाकडे संशयाने पाहिले जात आहे. नितीश यांच्या जागा कमी करण्यासाठीच भाजपने चिराग पासवान यांना स्वबळाची चूल मांडण्यास सांगितले, अशीही चर्चा सुरू आहे. 

चिराग पासवान यांना भाजपचीच फूस असल्याची उघड चर्चा सुरू झाली आहे. यामुळे सत्ताधारी एनडीएमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत. आता चिराग पासवान यांच्या विरोधात भाजपला कठोर भूमिका घ्यावी लागली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी आतापर्यंत चिराग पासवान यांच्याविरोधात थेट बोलणे टाळले होते. आता मात्र, भाजप नेते चिराग यांना लक्ष्य करु लागले आहेत. 

या विषयी बोलताना केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, लोक जनशक्ती पक्षाशी आमचा काहीही संबंध नाही, हे आम्ही स्पष्ट करतो. अशा प्रकारचे संभ्रमाचे राजकारण आम्हाला आवडत नाही. बिहारमध्ये भाजपची संयुक्त जनता दल (जेडीयू), जितनराम मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी यांच्याशी आघाडी आहे. एनडीए तीन चतुर्थांश जागा राज्यात मिळवेल. एलजेपी हा केवळ 'व्होट कटुआ' असून, त्यांचा फारसा परिणाम होणार नाही. 

भाजपचे सरचिटणीस व बिहार प्रभारी भूपेंद्र यादव यांनीही चिराग पासवान यांना लक्ष्ये केले. ते म्हणाले की, चिराग पासवान यांनी कोणत्याही भ्रमात राहू नये अथवा भ्रम पसरवू नये. यावर्षी फेब्रुवारीपर्यंत ते बिहार सरकारचे कौतुक करीत होते. आता मात्र, ते सरकाच्या विरोधात बोलत आहेत. पासवान यांच्याकडून खोटारडेपणाचे राजकारण सुरू आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख