जुनी वाहने १५ दिवसांत भंगारमध्ये काढण्यास सुरवात; नितीन गडकरींची मोठी घोषणा - union minister nitin gadkari says old vehicles scrapping policy in 15 days | Politics Marathi News - Sarkarnama

जुनी वाहने १५ दिवसांत भंगारमध्ये काढण्यास सुरवात; नितीन गडकरींची मोठी घोषणा

वृत्तसंस्था
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात वाहन स्क्रॅपिंग धोरण जाहीर केले आहे. यावर नितीन गडकरींनी मोठी घोषणा केली आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात वायू प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार म्हणून वाहन स्क्रॅपिंग धोरण जाहीर केले आहे. दरम्यान, अर्थमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल देताच 15 ते 20 वर्षे जुन्या वाहनांना भंगारमध्ये काढण्याची प्रक्रिया पुढील 15 दिवसांतच सुरू करू, अशी मोठी घोषणा केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.  

सीतारामन यांनी अर्थसंकल्पात वायू प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वाहन स्क्रॅपिंग धोरण आज जाहीर केले आहे. सीतारामन म्हणाल्या की, या धोरणामुळे जुन्या वाहनांची विल्हेवाट लावता येईल. यामुळे इंधन-कार्यक्षम, पर्यावरणास अनुकूल वाहनांना प्रोत्साहित करण्यास मदत होईल. ज्यायोगे वाहनांचे प्रदूषण आणि तेल आयात कमी होण्यास मदत मिळेल. 

यावर बोलताना गडकरी म्हणाले की, देशातील 15 ते 20 वर्षांपूर्वीच्या 51 लाख गाड्या तसेच जुनी 17 लाख वाहनेही लवकरच भंगारात जाणार आहेत. एकूण 1 कोटींहून अधिक जुन्या गाड्या बंद होतील. त्यातून प्रदूषण कमी होईल आणि रस्ता सुरक्षेलाही मदत होईल. शिवाय यातून 50 हजार रोजगार निर्माण होतील. वाहन निर्मितीच्या क्षेत्रात निर्यात वाढणे, विशेषतः वाहनांचे सुटे भाग भारतातच तयार केले जावेत यासाठी मी प्रयत्न केले. आयात सुट्या भागांवर कर वाढविल्याने 'मेक इन इंडिया'ला आणखी बळ मिळेल. 

पुढच्या पाच वर्षांत भारत मॅन्युफॅक्चरिंग हब होईल. छोट्या आणि मध्यम उद्योगांबरोबर वाहन उद्योग मोठा होत आहे. हा उद्योग 6 लाख कोटींच्या उलाढालीचा होईल. त्यामुळे जुन्या वाहनांची विल्हेवाट आवश्यकच आहे, जुनी वाहनं प्रदूषण खूप करतात. त्यामुळे ती पर्यावरणाला हानिकारक आहेत. ती रस्त्यावर धावणं बंद करणं हिताचं आहे. म्हणूनच स्क्रॅपिंग पॉलिसी आणण्यात येणार आहे. पुढच्या 15 दिवसात वाहनांच्या विल्हेवाटीसंदर्भातले नियम जारी केले जातील, असे गडकरी यांनी म्हटले आहे.
 
काय आहे स्क्रॅपिंग पॉलिसी?
जुन्या वाहनांची विल्हेवाट लावायची जबाबदारी वाहन मालकांची आहे. 20 वर्षांपूर्वीच्या गाड्या यापुढे वापरता येणार नाहीत. सविस्तर धोरणाची घोषणा पंधरा दिवसात करू, असं गडकरी यांनी सांगितलं आहे. या धोरणानुसार 51 लाख छोटी वाहनं स्क्रॅप होतील. 17 लाख मध्यम वाहनांचंही रिसायकलिंग होईल. यामुळे 23 ते 25 टक्के प्रदूषण कमी होईल. नवी वाहनं रस्त्यावर येतील. जुन्या वाहनांचं स्टील, इतर धातू, रबर याचा पुनर्वापर करण्यावर भर आहे. या धोरणामुळे ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये भारताचा क्रमांक जगात उंचावेल. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख