अनलॉक 5.0 : शाळा, चित्रपटगृहे, जलतरण तलाव सुरु होणार; प्रवासावर कोणतेही बंधन नाही - union home ministry releases guidlines for unlock 5 | Politics Marathi News - Sarkarnama

अनलॉक 5.0 : शाळा, चित्रपटगृहे, जलतरण तलाव सुरु होणार; प्रवासावर कोणतेही बंधन नाही

मंगेश वैशंपायन
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

केंद्र सरकारने अनलॉक 5.0 ची नियमावली जाहीर केली आहे. यात शाळा आणि चित्रपटगृहे खुली करण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज अनलॉक 5.0 ची नियमावली जाहीर केली असून, अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शाळा आणि चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर राज्यांतर्गत आणि आंतरराज्य प्रवासावर कोणतीही बंधन घालू नयेत, असे निर्देश दिले आहेत. 

राज्ये व राज्यशासित प्रदेशांना आता कंटन्मेंट झोनच्या बाहेर लॉकडाउन लागू करता येणार नाही. यात राज्य, जिल्हा, उपविभाग, शहर आणि गाव पातळीवरील लॉकडाउनचा समावेश आहे. लॉकडाउन लागू करावयाचा झाल्यास आधी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. कंटन्मेंट झोनमध्ये मात्र, लॉकडाउन लागू राहील. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. आता शाळा सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. याबाबतची निमयावली केंद्र सरकारचा शिक्षण विभाग लवकरच जाहीर करणार आहे. याचे काटेकोर पालन करणे शाळांसाठी बंधनकारक असेल. ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षण ही शिकवण्याची पद्धती कायम राहील आणि तिला प्रोत्साहन द्यावे, असे सरकारने म्हटले आहे. राज्ये 15 ऑक्टोबरपासून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस सुरू करणयाचा निर्णय घेऊ शकतात. मात्र यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी परवानगी असणे बंधनकारक आहे.

चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे 50% प्रेक्षक क्षमतेसह उघडण्यासाठी, तसेच संख्यामर्यादेसह राजकीय मेळावे, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, विशिष्ट अटींसह जलतरण तलाव यांनाही 15 ऑक्टोबरपासून परवानगी देण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावरील निर्बंध कायम आहेत. यातून केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संमती दिलेली आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू ठेवण्यास परवानगी असेल. याचवेळी राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीवर कोणतेही बंधन असणार नाही. यात प्रवासी आणि मालवाहतुकीचा समावेश असेल. वाहतुकीसाठी कोणतीही परवानगी अथना ई-परमिट घेण्याची आवश्यकता असणार नाही. 

- आंतरराज्य प्रवासी आणि मालवाहतुकीवर कोणतीही बंधने नाहीत 
- आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर 31 ऑक्टोबर पर्यंत बंदी कायम
- बिझनेस टू बिझनेस प्रदर्शनांना परवानगी. मात्र, 200 च्या पुढे ग्राहक आणि 10 च्या पुढे विक्रेते नसावेत असे बंधन.
- शाळा महाविद्यालये सुरू करण्यास मुभा देण्यात आली तरी ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षणाला प्राधान्य देण्याची सूचना  
- 15 ऑक्टोबरनंतर शिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय आणि त्याची पुढची जबाबदारी राज्य सरकारांची असेल
- उच्चशिक्षण, शास्त्र  शाखा आणि डॉक्टरेट करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसाठी परवानगी
- जलतरण तलाव फक्त प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुले राहणार 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख