उदयनिधींच्या अटकेने तमिळनाडूत सुडाच्या राजकारणाची ठिणगी..? - Udhayanidhi Stalin arrested on second day of campaign in Tamil Nadu | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल
बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंचे नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. त्यामुळे ही निवडणुक प्रक्रियाच रद्द करावी, अशी मागणी निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

उदयनिधींच्या अटकेने तमिळनाडूत सुडाच्या राजकारणाची ठिणगी..?

वृत्तसंस्था
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

तमिळनाडूत पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होत असून, आतापासूनच राज्यातील वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. 

नवी दिल्ली : तमिळनाडूत पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होत आहेत. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकने कालपासून जोरदार प्रचार मोहीम सुरू केली आहे. आज दुसऱ्याच दिवशी द्रमुकच्या युवा आघाडीचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांना अटक करण्यात आली आहे. द्रमुकचे अध्यक्ष स्टॅलिन यांचे पुत्र असलेले उदयनिधी यांच्या अटकेने राज्यातील वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.  

उदयनिधी ते अभिनेते व निर्माते आहेत. त्यांनी कालपासून जोरदार प्रचार सुरू केला होता. आज नागपट्टीनम या भागातील अक्कराईपेट्टाई या मच्छिमार वसाहतीत ते प्रचार करीत होते. जागतिक मच्छिमार दिनानिमित्त  त्यांनी तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांच्यासमवेत माजी मंत्री के.एन.नेहरू,  यू, मातीवानन, एमआरके पनीरसेल्वम आणि इतर नेते होते. मच्छिमारांशी संवाद साधून बोटीतून ते किनाऱ्यावर आल्यानंतर पोलिसांनी त्यांनी अटक केली.  

कोरोनाविषयक नियमांचा भंग करुन सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याप्रकरणी उदयनिधी यांना अटक करण्यात आली आहे. परवानगी न घेता प्रचार केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांना अटक करुन एका मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. 

उदयनिधी यांनी काल द्रमुकच्या प्रचाराची सुरूवात तिरुक्कुवलाई येथून केली होती. हे ठिकाण द्रमुकचे पक्षप्रमुख एम. करुणानिधी यांचे जन्मस्थान आहे. राज्यात सगळीकडे अंधकारमय वातावरण झाले असून, त्यातून बाहेर पडण्याचा संदेश उदयनिधी जनतेला देत आहेत. आता उदयनिधी यांनी प्रचाराची सुरूवात करताच सरकारने त्यांना अटक केली आहे. 

उदयनिधी यांच्या अटकेचे राज्यात ठिकठिकाणी पडसाद उमटले. अनेक ठिकाणी द्रमुक कार्यकर्त्यांनी रस्ते रोखून धरले. या कारवाईविषयी बोलताना उदयनिधी म्हणाले की, द्रमुकचा वाढता जनाधार पाहून अण्णाद्रमुक पक्ष भयग्रस्त झाला आहे. त्यामुळे द्रमुकच्या प्रचार मोहिमेत अडथळे निर्माण केले जात आहेत. 

तमिळनाडूतील सुडाच्या राजकारणाची पार्श्वभूमी पाहता उदयनिधी यांच्या अटकेने यातील नवीन अध्याय सुरू होण्याची भीती व्यक्त होत आहे. याआधी अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता आणि द्रमुकचे पक्षप्रमुख एम. करुणानिधी यांच्यात मोठे सूडनाट्य रंगले होते. आता अण्णाद्रमुकने उदयनिधी यांना अटक करुन याची नवीन नांदी तर केली नाही ना, अशी शक्यता व्यक्त होत आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख