मोदींचे गुजरातसाठी हजार कोटींचे पॅकेज तर ठाकरेंचा दोन दिवसांना ठरला दौरा - uddhav thackeray will visit konkan take review of cyclone affected areas | Politics Marathi News - Sarkarnama

मोदींचे गुजरातसाठी हजार कोटींचे पॅकेज तर ठाकरेंचा दोन दिवसांना ठरला दौरा

वृत्तसंस्था
बुधवार, 19 मे 2021

तौत चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांत कोकण दौरा करणार आहेत. 

मुंबई  : तौते चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 21 मे रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा दौरा करणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तौते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर गुजरात राज्यासाठी तातडीने 1 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. 

पत्रकार परिषदेत आज बोलताना राजेश टोपे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 21 मे रोजी स्वतः चक्रीवादळाचा फटका बसलेल्या जिल्ह्यांना भेट देणार आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. नुकसान आढावा घेऊन सरकार नुकसानभरपाई जाहीर करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातसाठी नव्हे  महाराष्ट्रासाठीही नुकसानभरपाई जाहीर करायला हवी होती. 

मोदींकडून गुजरात अन् दीवची हवाई पाहणी 
तौते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात 6 जणांचा, गुजरातमध्ये 2 जणांचा आणि कर्नाटकात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. याचवेळी हजारो घरांचे नुकसान झाले असून, विजेचे खांब मोठ्या प्रमाणात उन्मळून पडले आहेत. वादळामुळे हजारो एकर पिकांचे नुकसान झाले आहे. गुजरात आणि दीवमधील नुकसानीची पाहणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. 

गुजरातसाठी तातडीने 1 हजार कोटींचे पॅकेज 
मोदींनी यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक घेतली. मोदींनी गुजरातसाठी 1 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. तातडीने मदत म्हणून हे पॅकेज दिले जाणार आहे. याचबरोबर गुजरातमधील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिगटाची नियुक्ती करण्यात आली आहे. हा मंत्रिगट राज्याला भेट देऊन नुकसानीचा आढावा घेईल. या वादळामुळे देशभरात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाणार आहे. याचबरोबर जखमींना 50 हजार रुपये दिले जाणार आहेत.   

हेही वाचा : पुन्हा एकदा गेहलोत विरुद्ध पायलट; काँग्रेस आमदाराचा तडकाफडकी राजीनामा 

मागील आठवड्यात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यानंतर त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले. सुरूवातीला या वादळाची तीव्रता कमी होती. पुढे सरकत असतानाच वादळाची तीव्रता वाढत गेली आणि नंतर वादळाने रौद्र रुप धारण केले होते. मागील दोन दिवसांत केरळ, कर्नाटक व गोव्याला वादळाने जोरदार तडाखा दिला. नंतर वादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळून पुढे गेले. मुंबई, कोकण, ठाणे या भागांसह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. विजेचे खांब पडले असल्याने काही भागातील वीजपुरवठा बंद झाला होता.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख