तोंडात शेण भरून-भरून गोमूत्राच्या गुळण्या ठाकरे कुटुंबावर केल्या! - uddhav thackeray slams bjp leaders in dasara melava at mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल
बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंचे नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. त्यामुळे ही निवडणुक प्रक्रियाच रद्द करावी, अशी मागणी निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तोंडात शेण भरून-भरून गोमूत्राच्या गुळण्या ठाकरे कुटुंबावर केल्या!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांच्या घणाघाती भाषणाने गाजला. त्यांनी जोरदार हल्लाबोल करीत विरोधकांचा समाचार घेतला. 

मुंबई : काही जणांनी तोंडात शेण भरून गोमूत्राच्या गुळण्या ठाकरे कुटुंबावर केल्या. त्यांना मी सांगतो की, त्यांनी आता ते गिळावे अन गप्प बसावे. कारण आमचे हात स्वच्छ आहेत. स्वत: शेण खायचे आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा अशी यांची पद्धत आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. ठाकरे यांचा रोख अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करणाऱ्या भाजप नेत्यांवर होता.  

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे स्वत: मोटार चालवत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना घेऊन सायंकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्कवर दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार शिवाजी पार्क येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला मानवंदना दिली. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात दसरा मेळाव्याला सुरूवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक व प्रमुख नेते असे मोजकेच निमंत्रित मेळाव्याला उपस्थित होते. 

ठाकरे म्हणाले की, मध्यंतरी एक कोणीतरी त्याने आत्महत्या केली. लगेच तो बिहारचा पुत्र झाला. यानंतर मुंबई पोलिसांना लक्ष्य करण्यात आले. राज्यात कायदा व सुव्यवस्था नाही. मुंबई पोलीस निक्कमे आहेत, अशी टीका करण्यात आली. महाराष्ट्रात सगळीकडे गांजाची शेतीची सुरू असल्यासारखे चित्र रंगवण्यात आले. 

मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणण्यात आले. पंतप्रधानपदी 2014 मध्ये विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्याचे वचन दिले होते. आता मुंबईला व्याकव्याप्त काश्मीर म्हणणे हा मोदींचाच अपमान आहे. कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत. देशात जर पाकव्याप्त काश्मीर असेल तर ते मोदींचेच अपयश आहे. बिहारचा पुत्राच्या मृत्यूत काही काळबेर असेल ते शोधून काढा. परंतु, त्याच्या नावाने गळे काढणारे महाराष्ट्रावर चिखलफेक करीत आहेत, असा टोला ठाकरे यांनी लगावला.

दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्क मैदानात होणारा शिवसेनेचा भव्यदिव्य दसरा मेळावा यावर्षी मात्र तेथे झाला नाही. याला कारण होते कोरोना महामारीचे. शिवसैनिक आतुरतेने दसरा मेळाव्याची वाट पाहत असतात. मात्र, यंदा तो सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून फक्त  ५० जणांच्या उपस्थितीत झाला. यामुळे शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे. हा मेळावा शिवाजी पार्क परिसरातीलच स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झाला. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुरक्षा उपाययोजना जाहीर केल्या होत्या. यात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा होतो. त्यावेळी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर जमतात. एवढा मोठा जनसमुदाय जमल्यास सरकारनेच घालून दिलेल्या नियमांचा भंग होणार असल्याने हा मेळावा शिवाजी पार्कवर न घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

या मेळाव्याचे थेट प्रक्षेपण शिवसेनेच्या सोशल मीडिया हँडलवरुन करण्यात आले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच मेळावा आहे. उद्धव ठाकरे हे 27 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करीत आहेत. मात्र, ठाकरे कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यानंतरचा पहिलाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत नसल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झाल्यापासून दसरा मेळावा हा पक्षासाठी सर्वांत महत्वाचा कार्यक्रम मानला जातो. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख