मुख्यमंत्री म्हणतात, आता इंदू मिल स्मारकाचा कार्यक्रम होईल तो सगळ्यांच्या सहभागानेच! - uddhav thackeray says government will invite all parties to indu mill memorial program | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री म्हणतात, आता इंदू मिल स्मारकाचा कार्यक्रम होईल तो सगळ्यांच्या सहभागानेच!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

इंदू मिलच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी कार्यक्रमाच्या निमंत्रणावरुन आज मोठा गदारोळ उडाला. अखेर हा कार्यक्रम रद्द झाला आहे. 

मुंबई : घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलच्या आवारातील पुतळ्याच्या पायाभरणी कार्यक्रमाच्या निमंत्रणांवरुन राजकारण सुरु झाले आहे. खुद्द प्रकाश आंबेडकर यांना तसेच, विरोधी पक्षनेत्यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले नव्हते. त्यावरुन तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अखेर कुठलेही कारण न देता हा कार्यक्रमच रद्द करण्यात आला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होईल, असे जाहीर केले आहे. यात राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे. यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही, असे सांगून ठाकरे म्हणाले की, एमएमआरडीएने राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली. त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले. मात्र, अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी लक्षात आणून दिले आहे. त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व  आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश मी दिले आहेत.

'एमएमआरडीए'ने हा कार्यक्रम आयोजित केला होता. आज दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार होता. त्याचे निमंत्रण अनेक नेत्यांना नसल्याचे सकाळपासून समोर येऊ लागले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या दोघांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. त्यावरुन दरेकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, मला आणि देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण मिळाले नाही. हे सरकार अहंकाराने भरलेले आहे. खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांच्या काळात स्मारकाच्या कामाला गती मिळाली. हे सरकार कोणत्याही कार्यक्रमाला विरोधी पक्षांना सन्मानाने बोलवत नाही. 

आनंदराज आंबेडकर यांनाही सकाळपर्यंत या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. याबाबत ते म्हणाले होते की, मला आज सकाळी इंदू मिल मधील कार्यक्रमाची माहिती मिळाली. 'एमएमआरडीए' आम्हाला पहिल्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण आता त्या ठिकाणी समुद्राची वाळू आणि पाणी येत आहे हे मी त्यांना दाखवून दिले होते. मला जरी उशिरा निमंत्रण दिले असले तरी मी सर्व राग क्रोध बाजूला ठेऊन मी या कार्यक्रमाला जाणार आहे आहे कारण मला या कामानिमित्त मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. 

नंतर हा कार्यक्रमच पुढे ढकलण्यात आला. यावर आनंदराज आंबेडकर म्हणाले की, राज्यात अनेक प्रश्न सुरू असताना सरकारला एवढी घाई का? मराठा आरक्षणावरुन वाद सुरू आहे त्यात हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का? 

प्रकाश आंबेडकर यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. त्यांनीही याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, अशा कार्यक्रमात मला रस नाही. कोणाला बोलवायचे आणि कोणाला नाही हा त्यांचा प्रश्न आहे. तरीही मला कोणावर ही आरोप करायचे नाहीत. उद्धव ठाकरे आणि माझे संबंध चांगले आहेत, आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत माझे संबंध कसे आहेत हे तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे कोणी काटा घातला असेल हे तुम्ही समजू शकता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माझी विनंती आहे की अटल बिहारी वाजपेयींची नोट आहे इंदू मिल च्या जागे बाबत त्याचा अभ्यास करावा. वाजपेयींना काय अपेक्षित होतं ते ठाकरेंनी बघावं व त्यासाठी पुढाकार घ्यावा. माझा स्मारकाच्या आराखड्याबाबत सुरवातीपासून आक्षेप आहे, असेही ते म्हणाले. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख