बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी उद्धव अन् राज यांचे गुप्तगू

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याच्या अनावरणाला आज राजकीय मांदियाळी जमली होती.
uddhav thackeray and raj thackeray meet at balasaheb thackeray statue inaugaration
uddhav thackeray and raj thackeray meet at balasaheb thackeray statue inaugaration

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत हा भव्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनंतर राज आणि उद्धव हे गुप्तगू करताना दिसले. 

बाळासाहेब ठाकरेंच्या 95 व्या जयंतीनिमित्त या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांचा हा भव्य पुतळा 9 फूट उंच असून, 1 हजार 200 किलो ब्राँझपासून त्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली असून, ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा तयार केला आहे. गेले काही वर्षे हा पुतळा लालफितीत अडकला होता. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार सत्तेवर येताच हा पुतळा उभारण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या मिळाल्या आहेत.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यासोबत राज ठाकरे प्रथमच एकाच मंचावर आले होते. उद्धव ठाकरेंनी नोव्हेंबर 2019 मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. शिवाजी पार्कात झालेल्या सोहळ्याला राज ठाकरे यांनीही हजेरी लावली होती. त्यानंतर आज राज आणि उद्धव ठाकरे एका मंचावर आले. दोघांमध्ये काही काळ गुप्तगू झाल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. 

या कार्यक्रमानंतर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्व शिवसैनिकांप्रमाणे माझ्या कायम लक्षात राहणारा क्षण आहे. अशा प्रसंगी फार बोलता येत नाही. शिवसेनाप्रमुख देशातील मोठे नेते आणि मार्गदर्शक होते. सर्व पक्षांतील नेत्यांशी त्यांचे ऋणानुबंध होते. 

बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ऑक्टोबर 2015 मध्ये मांडला होता. नंतर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार हा पुतळा दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com