मोदीजी, तुमची जीएसटी फसली; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल - uddhav tackeray says narendra modi should reform gst or cancel it | Politics Marathi News - Sarkarnama

मोदीजी, तुमची जीएसटी फसली; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ऐतिहासिक ठरला आहे. या मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारसह भाजपवर हल्लाबोल केला. 

मुंबई : वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) आमचा हक्काचा वाटा आम्हाला देत येत नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती फसली हे कबूल करायला हवे. मोदींनी चूक मान्य करुन जीएसटीत सुधारणा तरी करावी अन्यथा ती रद्द करावी, असा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आवाहनही केले आहे. 

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे स्वत: मोटार चालवत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना घेऊन सायंकाळी शिवाजी पार्कवर दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार शिवाजी पार्क येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला मानवंदना दिली. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात दसरा मेळाव्याला सुरूवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक व प्रमुख नेते असे मोजकेच निमंत्रित मेळाव्याला उपस्थित होते. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रावर अतिवृष्टीचे संकट आले. यात घरेदारे वाहून गेली, जमीन खरवडून गेली. आम्ही मदत करतोय पण पैसे कोठून आणायचे? आपल्या हक्काचे जीएसटीचे 38 हजार कोटी केंद्र सरकारकडे बाकी असूनही ते देत नाहीत. राज्यांना कर्ज उभारण्यास सांगण्यात येत आहे. ते कर्ज फेडायचे कुणी? इथला पैसा दिल्लीत जाणार अन् दिल्लीतून त्याचे सगळीकडे वाटप होणार असे सुरू आहे. जीएसटी फसली असून, त्याजागी दुसरी करप्रणाली आणावी. 

दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्क मैदानात होणारा शिवसेनेचा भव्यदिव्य दसरा मेळावा यावर्षी मात्र तेथे झाला नाही. याला कारण होते कोरोना महामारीचे. शिवसैनिक आतुरतेने दसरा मेळाव्याची वाट पाहत असतात. मात्र, यंदा तो सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून फक्त  ५० जणांच्या उपस्थितीत झाला. यामुळे शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे. हा मेळावा शिवाजी पार्क परिसरातीलच स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झाला. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुरक्षा उपाययोजना जाहीर केल्या होत्या. यात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा होतो. त्यावेळी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर जमतात. एवढा मोठा जनसमुदाय जमल्यास सरकारनेच घालून दिलेल्या नियमांचा भंग होणार असल्याने हा मेळावा शिवाजी पार्कवर न घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

या मेळाव्याचे थेट प्रक्षेपण शिवसेनेच्या सोशल मीडिया हँडलवरुन करण्यात आले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच मेळावा आहे. उद्धव ठाकरे हे 27 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करीत आहेत. मात्र, ठाकरे कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यानंतरचा पहिलाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत नसल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झाल्यापासून दसरा मेळावा हा पक्षासाठी सर्वांत महत्वाचा कार्यक्रम मानला जातो. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख