ठाणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींवर कोरोनामुक्तीचा झेंडा - Two Twenty one Gram Panchayats in Thane Became Corona Free | Politics Marathi News - Sarkarnama

ठाणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींवर कोरोनामुक्तीचा झेंडा

राहुल क्षीरसागर
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ग्रामपंचायतीत २८ दिवसांत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येणार नाही. अशा ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात तसेच गावात हिरवा झेंडा लावण्याची नवी युक्ती लढवली

ठाणे  : जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश येत आहे. त्यातच आता जिल्हा परिषद प्रशासनासह आरोग्य विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्र घोषित करणे, त्या क्षेत्रातील घरांचे सर्वेक्षण करणे, आदींसह ज्या ग्रामपंचायतींमध्ये २८ दिवसांत एकही नवी रुग्णाची नोंद झाली नाही. अशा ग्रामपंचायत क्षेत्रात हिरवा झेंडा लावण्यात येणार असल्याची नवी युक्ती जिल्हा परिषद प्रशासनाकडून लढविण्यात आली. त्याची फलश्रुती म्हणून जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांतील २२१ ग्रामपंचायती या कोरोनामुक्त झाल्या असून, त्या ठिकाणी हिरवा झेंडा रोवण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.

मार्च महिन्यात जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तालुक्‍यांमध्ये सुरुवातीच्या काळात दररोज थोड्या फार प्रमाणात रुग्ण आढळून येत होते. कालांतराने या भागात दिवसाला शंभरहून अधिक रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. यामुळे या भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आठ हजार १०२, तर मृतांची संख्या २७६ वर पोहोचली. त्यामुळे कोरोना रुग्णांची ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून रुग्ण आढळून येणाऱ्या विभागात १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून आरोग्य पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यावर भर देण्यात आला. 

तसेच कोरोना प्रतिबंधित करण्याविषयी जनजागृती करणे, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना क्वारंटाईन सेंटर, फिव्हर क्‍लिनिक, अँटीजन टेस्टिंगवर भर देण्यात आला. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांचा शोध घेणे सोपे झाले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सद्यस्थितीत कोरोना बाधितांवर उपचारासाठी पुरेशा प्रमाणात आरोग्य व्यवस्था उपलब्ध असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढ असल्याचे दिसून येत आहे.

मुरबाडमधील सर्वाधिक ग्रामपंचायती
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ग्रामपंचायतीत २८ दिवसांत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येणार नाही. अशा ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात तसेच गावात हिरवा झेंडा लावण्याची नवी युक्ती लढवली. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ४३० ग्रामपंचायतींपैकी २२१ ग्रामपंचायतींमध्ये २८ दिवसांपासून एकही रुग्ण आढळून आला नसल्याने त्या ग्रामपंचायतींमध्ये कोरोनामुक्तीचा हिरवा झेंडा रोवण्यात आला. यामध्ये मुरबाड तालुक्‍यातील सर्वाधिक ९३ ग्रामपंचायती या कोरोनामुक्त झालेल्या आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख


तालुका ग्रामपंचायत संख्या हिरवा झेंडा प्राप्त ग्रामपंचायती
अंबरनाथ  २८  १२
भिवंडी १२० ३६
कल्याण ४६ १९
मुरबाड १२६ ९३
शहापूर ११० ६१