भाजपकडून दोन उपमुख्यमंत्री पण मोदींचा पत्ता कट...विधानसभा अध्यक्षपदही मिळणार

बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ आज नितीशकुमार घेत आहेत. उपमुख्यमंत्रिपदावरुन भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरू असून, अखेर पक्षाने दोन उपमुख्यमंत्रीनेमण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
two deputy chief ministers and assembly speaker post in bihar for bjp
two deputy chief ministers and assembly speaker post in bihar for bjp

पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा नितीशकुमार हेच असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी तारकिशोर प्रसाद तर उपनेतेपदी रेणू देवी यांची निवड करण्यात आली आहे. भाजपकडून हे दोन नेते उपमुख्यमंत्री होतील पण सुशीलकुमार मोदी यांचा पत्ता कट झाला आहे. विधानसभा अध्यक्षपदही भाजपकडेच राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत झाली होती. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस, डावे यांची महाआघाडी असे चित्र होते. एनडीने 125 जागा मिळवत स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला आहे. याचवेळी महाआघाडीने 110 जागा मिळवल्या आहेत. 

राज्यात राष्ट्रीय जनता दल 75 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर 74 जागांसह भाजप आहे. जेडीयूला 43 जागा मिळाल्या असून, काँग्रेसला 19 जागा आहेत. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. नितीश यांच्या जेडीयूला कमी जागा मिळाल्याने ते पुन्हा मुख्यमंत्री होणार का अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर भाजपने नितीशकुमार यांचेच नाव पुढे केले आहे. सत्ता स्थापनेची चर्चा करण्यासाठी एनडीएची बैठक काल (ता.१५) झाली. या बैठकीत मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार यांचे नाव निश्चित करण्यात आले. आज सायंकाळी ४.३० वाजता नितीशकुमार यांचा शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

भाजपने विधिमंडळ नेतेपदी तारकिशोर प्रसाद यांची निवड केली आहे. उपनेतेपदी रेणू देवी यांची निवड झाली आहे. भाजपने अद्याप उपमुख्यमंत्रिपदी कोण असेल याची घोषणा केलेली नाही. या दोन्ही नेत्यांना उपमुख्यमंत्री केले जाणार आहे. याचबरोबर विधानसभा अध्यक्षपदही भाजपकडे राहील, असा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सुशीलकुमार मोदी यांची उपमुख्यमंत्री करण्यात येणार नसून, याबाबतचा निर्णय कालच घेण्यात आला आहे. याबद्दल मोदी यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. मोदी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी दिली जाणार आहे. राज्यातून दिल्लीत जाणाऱ्या नाखूश असलेल्या मोदींसमोर पक्षाने आता केंद्रीय मंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवला असून, ते हा प्रस्ताव स्वीकारण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सुशीलकुमार मोदी यांनी थेट यावरुन पक्षाला घरचा आहेर दिला होता. त्यांनी ट्विटरवर म्हटले होते आहे की, भाजप आणि संघ परिवाराने माझ्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दित दुसऱ्या कोणाकडून मिळणार नाही एवढे दान दिले आहे. यापुढेही पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती पार पाडू. माझे कार्यकर्ता पद तर कोणी काढून घेऊ शकत नाही. 

यावर केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांनी मोदींची जाहीर समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी ट्विटरवर म्हटले होते की, आदरणीय सुशीलजी तुम्ही नेते आहात. उपमुख्यमंत्रिपद तुमच्याकडे होते आणि तुम्ही पुढेही भाजपचे नेते रहाल. पदाने कोणी नेता लहान मोठा होत नाही. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com