शशिकलांच्या निवृत्तीमागील नेमकं कारण काय? भाचा दिनकरनने केला गौप्यस्फोट

शशिकला यांनी अचानक राजकारणातून निवृत्ती जाहीर करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
ttv dinakaran says no one forced sasikala to retire from politics
ttv dinakaran says no one forced sasikala to retire from politics

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांनी अचानक राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती जाहीर करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. भारतीय जनता पक्षाने (भाजप) दबाव आणल्याने शशिकलांनी राजकारणातून निवृत्ती घेतली, अशी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे भाचे व आमदार टी.टी.व्ही. दिनकरन यांनी अखेर यामागील घडामोडींचा उलगडा केला आहे. 

शशिकलांच्या निवृत्तीचा सर्वांत मोठा धक्का त्यांचे भाचे  व अम्मा मक्कल मुनेत्र कळघम (एएमएमके) पक्षाचे नेते दिनकरन यांना बसला होता. शशिकलांनी निवृत्ती जाहीर करण्याआधीच ते शशिकलांच्या निवासस्थानी हजर होते. बराच वेळ शशिकलांची समजूत काढण्याचा प्रयत्न दिनकरन यांनी केला होता. मात्र, शशिकला या निर्णयावर ठाम राहिल्याने अखेर दिनकरन यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. 

शशिकलांच्या निवृत्तीमागील घडामोडींचा दिनकरन यांनी उलगडा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय शशिकलांनी स्वत: घेतला होता. यासाठी त्यांच्यावर कुणीही दबाव आणला नव्हता. बंगळूरमधून परतल्यानंतर पूर्णवेळ राजकारणात उतरण्याचे त्यांनी ठरवले होते. मात्र, अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी वारंवार त्यांच्याबद्दल चुकीची विधाने केली. मला पक्षात पुन्हा प्रवेश करायचा आहे, असे त्यांनी म्हटले होते का? एखाद्याला प्रवेश करायचा असेल तर नेते त्यावर चांगली अथवा वाईट प्रतिक्रिया देऊ शकतात. परंतु, शशिकलांना जनतेने पक्षाच्या सरचिटणीसपदी बसवले होते. कार्यकर्त्यांनी त्यांच्या पायावर पडून त्यांना हे पद स्वीकारण्यास भाग पाडले होते. मात्र, त्यांच्या सुटकेनंतरच्या घडामोडी पाहून त्या व्यथित झाल्या आणि राजकारण सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 

शशिकलांच्या निवृत्तीमागे भाजपचा हात असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याबद्दल दिनकरन यांनी म्हटले आहे की, हे खरे नाही. भाजपमधील कुणीही माझ्याशी अथवा शशिकलांशी संपर्क साधला नाही. राजकारण सोडण्यासाठी त्यांच्यावर कुणीही दबाव आणला नाही. माझ्यावरही राजकारण सोडण्यासाठी दबाव असल्याची चर्चा सुरू होती. परंतु, माझ्यावर कुणीही दबाव आणू शकत नाही. काही जण मुद्दामहून अशा अफवा पसरवत असतात. 

शशिकलांनी 3 मार्चला निवेदन जाहीर केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, जया (जयललिता) जिवंत असताना मी कधीही सत्ता अथवा पदाच्या मागे धावले नाही. जललितांचा मृत्यू झाल्यानंतर असे कदापी घडणे शक्य नाही. तमिळनाडूत अण्णाद्रमुकला सोन्याचे दिवस यावेत यासाठी मी राजकारणापासून दूर राहत आहे. मी ईश्वर आणि माझ्या बहिणीला (जयललिता) अण्णाद्रमुकच्या विजयासाठी प्रार्थना करते. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन द्रमुकचा पराभव करावा. जयललितांचा वारसा कायम राखण्यासाठी पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी काम करावे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com