हैदराबाद : हैदराबाद महापालिकेत सत्ता आल्यास दर महिन्याला नागरिकांना वीस हजार लिटर मोफत पाणी देण्याचे आश्वासन राज्यातील सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीने (टीआरएस) दिले होते. काँग्रेसने यावर कडी करीत आज नागरिकांना ३० हजार लिटर मोफत पाणी देणार असल्याचे जाहीर केले आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नागरिकांना मोफत पाण्याचे आश्वासन देण्याची चढाओढ राजकीय पक्षांमध्ये सुरू आहे. इतरही आश्वासनांची खैरात सध्या पक्षांकडून होत आहे.
हैदराबाद महापालिकेच्या प्रचाराला वेग आला आहे. राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून, आरोप-प्रत्यारोपांत्या फैरी सुरू झाल्या आहेत. महापालिकेसाठी येत्या १ डिसेंबरला मतदान होणार असून, ४ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. टीआरएसचे प्रमुख व मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी नागरिकांना दरमहा 20 हजार लिटर पाणी देण्याची घोषणा केली होती. त्यांनी म्हटले होते की, दिल्लीनंतर अशी योजना हैदराबादमध्ये सुरू होईल. डिसेंबरपासून दरमहा नागरिकांना 20 हजार लिटर पाणी मोफत मिळेल. याचा फायदा हैदराबादमधील 97 टक्के नागरिकांना होईल.
काँग्रेसने आज महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा जाहीर केला. तेलंगणचे प्रभारी मनिकाम टागोर यांनी तो जाहीर केला. जाहीरनाम्यात अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. हैदराबादमध्ये नुकत्याच झालेल्या पावसामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २५ लाख रुपये मदत देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. याचबरोबर पावसामुळे पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी घरमालकाला पाच लाख आणि किरकोळ हानी झालेल्या घरांसाठी अडीच लाखांची मदत देण्याचेही काँग्रेसने जाहीर केले आहे. पूरग्रस्त कुटुंबांना ५० हजार रुपयांची मदत देण्याचेही म्हटले आहे.
झोपडपट्टी भागातील आणि दोन बेडरुम असलेल्या घरांना शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल आणि त्यासाठी मोफतपणे आरओ प्रणाली बसवली जाईल. कोविडबाधित रुग्णांवर आरोग्यश्री योजनेअंतर्गत उपचार केले जातील, तसेच आरोग्य विमा कवच, दिव्यांग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांना मेट्रो आणि बसमधून मोफत प्रवास आदी आश्वासनेही काँग्रेसने दिली आहेत.
हैदराबाद महापालिकेसाठी टीआरएसने सगळ्या 150 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. याचवेळी भाजप 149, काँग्रेस 146, तेलगू देसम पक्ष (टीडीपी) 106, एआयएमआयएम 51, डावे पक्ष 29 जागांवर निवडणूक लढत आहेत. मागील 2016 च्या निवडणुकीत टीआरएसने 99 जागांवर विजय मिळवून सत्ता स्थापन केली होती. यावेळीही टीआरएसने सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.
Edited by Sanjay Jadhav

