मुंबई कोरोनामुक्तीकडे..छोटी कोविड केंद्र बंद - Towards Mumbai Coronamukti..Small Kovid Center closed | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई कोरोनामुक्तीकडे..छोटी कोविड केंद्र बंद

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

सध्या १९ हजार सक्रिय रुग्णांपैकी पाच हजार ४२६ रुग्ण कोविड केअर सेंटर अथवा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मुंबई : कोरोनाचा प्रसार मुंबईत आता हळूहळू नियंत्रणात येत असल्याने रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या १९ हजार सक्रिय रुग्णांपैकी पाच हजार ४२६ रुग्ण कोविड केअर सेंटर अथवा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

त्यामुळे एकूण ७३ हजार खाटांपैकी ६७ हजार ५७४ खाटा रिक्त असल्याने छोटी केंद्रे बंद करण्यात येत आहेत. मात्र जम्बो फॅसिलिटी सेंटर आणखी काही काळ सुरू राहणार आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर पालिका रुग्णालयात जागा कमी पडू लागली. मे महिन्याच्या अखेरीस बाधित रुग्णांची संख्या एक लाखाहून अधिक असेल, अशी भीती व्यक्त होत होती. त्यामुळे त्या प्रमाणात खाटा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेने छोटी-मोठी ४०३ कोरोना केअर सेंटर मुंबईत उभारली. 

यामध्ये एकूण ७३ हजार खाटा उपलब्ध करण्यात आल्या. मुंबईत कोरोनाचा प्रसार आता नियंत्रणात येत असून आतापर्यंत ९८ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  मुंबईत सध्या १९ हजार १९० सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्क्यांवर गेल्यामुळे कोरोना केअर सेंटरमधील खाटा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.

हॉटेल, शाळा, इमारतींमध्ये सुरू केलेली केंद्रे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येत आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल, गोरेगाव नेस्को, ‘एनएससीआय’ वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स, दहिसर, मुलुंड येथील जम्बो हेल्थ सेंटर सुरू राहणार आहेत.

पुणे जिल्ह्यात  १७७३ जण कोरोनामुक्त 
पुणे जिल्ह्यात गुरुवारी  (ता.१३) दिवसभरात २ हजार ३८८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे  शहरातील सर्वांधिक १ हजार ९१ जणांचा समावेश आहे. दरम्यान, दिवसभरात १ हजार ७७३ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ८८ हजार ५९० झाली आहे. 

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ  पिंपरी चिंचवडमध्ये ९२२,  जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात २१२, नगरपालिका क्षेत्रात ७९ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ८४ नवे रुग्ण सापडले आहेत.

दरम्यान, आज ७० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ३६ रुग्ण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील १३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १०, नगरपालिका क्षेत्रातील ५ आणि कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील सहा जणांचा समावेश आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही (ता. १२) रात्री ९ वाजल्यापासून (ता. १३) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. 

कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांपैकी सर्वांधिक ५३ हजार ९५८ पुणे शहरातील आहेत. पिंपरी-चिंचवडमधील  २३ हजार ७३२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६ हजार ९१६, नगरपालिका क्षेत्रातील १ हजार ९९५ आणि कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एक हजार ९८९ कोरोनामुक्त झाले आहेत.
Edited  by : Mangesh Mahale  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख