राज्यपाल हे रक्तपिपासू अन् पिसाळलेल्या कुत्र्यासारखे : खासदार बॅनर्जी

नारद भ्रष्टाचार प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे दोन मंत्री, एक आमदारासह माजी महापौराला अटक करण्यात आली आहे. यावरुन पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे.
TMC MP says WB Governor is bloodsucker and roaming around like mad dog
TMC MP says WB Governor is bloodsucker and roaming around like mad dog

कोलकता : नारद भ्रष्टाचार (Narada Scam) प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे (TMC) दोन मंत्री, एक आमदारासह माजी महापौराला आज सकाळी अटक करण्यात आली. यावरुन पश्चिम बंगालमधील (West Bengal) राजकीय वातावरण तापले आहे. तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यपालांना (Governor) या प्रकरणी लक्ष्य करीत त्यांना पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा दिली आहे. 

सीबीआयने तृणमूलचे विद्यमान मंत्री सुब्रत मुखर्जी, फिरहाद हकीम, आमदार मदन मित्रा आणि कोलकत्याचे माजी महापौर सोवन चटर्जी यांना अटक केली आहे.  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत थेट सीबीआयचे कार्यालय गाठले होते. तेथे काही तास आंदोलन केल्यानंतर या कारवाईला न्यायालयात आव्हान देण्याचे जाहीर करुन त्या बाहेर पडल्या होत्या. 

याप्रकरणी तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनकर यांच्यावर निशाणा साधला आहे.  ते म्हणाले की, राज्यपाले हे रक्तपिपासू आहेत. ते एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे फिरू लागले आहेत. राजकीय सूडबुद्धीने ते काम करीत असून, राज्य सरकारचा सल्ला न घेता ते निर्णय घेत आहेत. राज्यपालांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपकडून तिकिट मिळवायचे आहे. यामुळे ते तृणमूलच्या विरोधात कारवाया करीत आहेत. राज्यपाल हे लहरी असून, त्यांना आता राज्यात एक मिनिटही थांबू नये. 

सीबीआयच्या कारवाईवर मॅथ्यू सॅम्युअल यांनी समाधान व्यक्त केले. परंतु, सीबीआयने पक्षपात न करता यात अडकलेल्या सर्व नेत्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांना अटक का झाली नाही, असा प्रश्‍नही त्यांनी केला. स्टिंग ऑपरेशनमधील आवाजाची न्यायवैद्यक चाचणी केल्यानंतर तो आवाज स्वतःचा असल्याची कबुली सुवेंदू अधिकारी यांनी दिली होती, असे मॅथ्यू यांनी नमूद केले. भाजप नेते मुकुल रॉय यांच्या सूचनेवरून मॅथ्यू यांच्याकडून पैसे स्वीकारल्याची माहिती त्‍यावेळी एका आयपीएस अधिकाऱ्याने देऊनही सीबीआयने रॉय यांना अभय दिल्याबद्दल मॅथ्यू यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 

नारद स्टिंग ऑपरेशनमधील गैरव्यवहार हा मार्च २०१६ मधील विधानसभा निवडणुकीवेळी झाला होता. नारद न्यूज पोर्टलचे मॅथ्यू सॅम्युअल यांनी निवडणुकीआधी व्हिडिओ चित्रफीत प्रसारित करीत पश्‍चिम बंगालच्या राजकारणाला मोठा धक्का दिला होता. या चित्रफीतीत ते एका कंपनीचे प्रतिनिधीच्या रूपात दिसून आले. तृणमूल काँग्रेसचे सात खासदार, तीन मंत्री आणि कोलकता महापालिकेचे महापौर सोवन चॅटर्जी यांना कामाच्या बदल्यात ते मोठी रक्कम देत असल्याचे दिसू आले. 

हे भ्रष्टाचाराचे प्रकरण सीबीआयपर्यंत पोचू नये, यासाठी तृणमूल काँग्रेसने मोठा आटापिटा केला होता. भाजपचे  हे कारस्थान असल्याचा आरोपही केला, परंतु, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन सरकारविरोधात निकाल दिला होता. स्टिंग ऑपरेशन’संबंधी सीबीआयकडून तपास करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मार्च २०१७मध्ये दिला होता. तृणमूल सरकारने सॅम्युअल यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करीत त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. उच्च न्यायालयाने सॅम्युअल यांना दिलासा दिला होता. न्यायवैद्यक तपासणीत चित्रफीत खरी असल्याचे सिद्ध झाले होते. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com