बंगालमध्ये अटकनाट्याचे अंक : सकाळी अटक, संध्याकाळी जामीन, रात्री जामीन रद्द अन् तुरुंग ते पहाटे रुग्णालय

नारद भ्रष्टाचार प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना सीबीआयने अटक केली असून, यावरुन पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे.
tmc leaders arrested by CBI in Narada case sent to jail by high court
tmc leaders arrested by CBI in Narada case sent to jail by high court

कोलकता : नारद भ्रष्टाचार (Narada Scam)  प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे (TMC) दोन मंत्री, एक आमदारासह माजी महापौराला काल सकाळी सीबीआयने (CBI) अटक करण्यात आली होती. यानंतर सुरू झालेल्या नाट्यमय घडामोडी आज पहाटेपर्यंत सुरू होत्या. यातील दोन नेते आता तुरुंगात आहेत तर दोघे रुग्णालयात दाखल आहेत. यावरुन पश्चिम बंगालमधील (West Bengal) राजकीय वातावरण तापले आहे. 

सीबीआयने तृणमूलचे विद्यमान मंत्री सुब्रत मुखर्जी, फिरहाद हकीम, आमदार मदन मित्रा आणि कोलकत्याचे माजी महापौर सोवन चटर्जी यांना सीबीआयने काल अटक केली. काल सायंकाळी या चौघांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली होती. त्यांना न्यायालयाने जामीनही मंजूर केला होता परंतु, सीबीआयने याला उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने तो रद्दबातल ठरवला आणि या चार नेत्यांची रवानगी तुरुंगात झाली. 

या चारही नेत्यांना तुरुंगात नेण्यात आले होते. आज पहाटे आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर सोवन चटर्जी यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. सुब्रत मुखर्जी यांनाही काही काळ तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु, वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना परत तुरुंगात पाठवण्यात आले. 

तृणमूल नेत्यांना सीबीआयने अटक केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्या थेट सीबीआयच्या कार्यालयावर धडकल्या होत्या. मला अटक करा, असे आव्हान त्यांनी सीबीआयला दिले होते. तसेच, त्या 6 तास कार्यालयातच ठिय्या देऊन बसल्या होत्या. त्यावेळी तृणमूलचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सीबीआयच्या कार्यालयाबाहेर जमा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर न्यायालयात या कारवाईला आव्हान देण्याचे जाहीर करुन ममता बॅनर्जी तेथून बाहेर पडल्या होत्या. 

मुकुल रॉय, सुवेंदू अधिकारीवर कारवाई का नाही? 
स्टिंग ऑपरेशन घडवून आणलेल्या नारद न्यूज पोर्टलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथ्यू सॅम्युअल या कारवाईवर आता काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सीबीआयच्या कारवाईवर मॅथ्यू सॅम्युअल यांनी समाधान व्यक्त केले. परंतु, सीबीआयने पक्षपात न करता यात अडकलेल्या सर्व नेत्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी आणि मुकुल रॉय यांना अटक का झाली नाही, असा प्रश्‍नही त्यांनी केला. 

स्टिंग ऑपरेशनमधील आवाजाची न्यायवैद्यक चाचणी केल्यानंतर तो आवाज स्वतःचा असल्याची कबुली सुवेंदू अधिकारी यांनी दिली होती, असे मॅथ्यू यांनी नमूद केले. भाजप नेते मुकुल रॉय यांच्या सूचनेवरून मॅथ्यू यांच्याकडून पैसे स्वीकारल्याची माहिती त्‍यावेळी एका आयपीएस अधिकाऱ्याने देऊनही सीबीआयने रॉय यांना अभय दिल्याबद्दल मॅथ्यू यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 

काय आहे नारद स्टिंग ऑपरेशन? 
नारद स्टिंग ऑपरेशनमधील गैरव्यवहार हा मार्च २०१६ मधील विधानसभा निवडणुकीवेळी झाला होता. नारद न्यूज पोर्टलचे मॅथ्यू सॅम्युअल यांनी निवडणुकीआधी व्हिडिओ चित्रफीत प्रसारित करीत पश्‍चिम बंगालच्या राजकारणाला मोठा धक्का दिला होता. या चित्रफीतीत ते एका कंपनीचे प्रतिनिधीच्या रूपात दिसून आले. तृणमूल काँग्रेसचे सात खासदार, तीन मंत्री आणि कोलकता महापालिकेचे महापौर सोवन चॅटर्जी यांना कामाच्या बदल्यात ते मोठी रक्कम देत असल्याचे दिसू आले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com