भाजप खासदाराच्या पत्नीलाच तृणमूल काँग्रेसने विधानसभेच्या मैदानात उतरवलं

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तृणमूल काँग्रेसने आज उमेदवारांची यादी जाहीर केली.
tmc fields bjp mp soumitra khan wife sujata mondal from arambagh
tmc fields bjp mp soumitra khan wife sujata mondal from arambagh

कोलकता : आगामी विधानसभा निवडणुकीमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे आज विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी जाहीर केली. विशेष म्हणजे, या यादीत भाजपचे खासदार व भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मोंडल खान यांचा समावेश आहे. तृणमूलने भाजपला हा मोठा धक्का दिला आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस सत्तेत असून, ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत 2016 मध्ये तृणमूलला 294 पैकी 211 जागा मिळाल्या होत्या, तर डावे पक्ष व काँग्रेसचे 76 उमेदवार निवडून आले होते. भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र, या वेळी भाजपने सत्तापालट करण्यासाठी जोर लावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 42 पैकी 18 जागा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. सध्या तृणमूल विरुध्द भाजप असेच  चित्र दिसत आहे. तर डावे पक्ष व काँग्रेसची आघाडी या निवडणुकीतही कायम राहणार आहे. 

तृणमूल काँग्रेसन आज 291 मतदारसंघांची उमेदवार यादी जाहीर केली. तृणमूलने त्यांच्या वाट्याला असलेल्या सर्वच्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तृणमूलने तीन जागा गोरखा जनमुक्ती मोर्चासाठी ठेवल्या आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. ममता बॅनर्जी यांनी त्यांचा परंपरागत भवानीपूर मतदारसंघ सोडला असून, त्या नंदिग्राममधून लढणार आहेत. त्या 10 मार्चला नंदिग्राममधून अर्ज भरतील. 

तृ़णमूलने भाजपचे खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता यांना उमेदवारी देऊन सर्वांनाचा धक्का दिला आहे.  सौमित्र खान हे 2014 मध्ये तृणमूलकडून विष्णूपूरमधून खासदार झाले होते. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते सध्या भाजपच्या युवा मोर्चाचे प्रमुख आहेत. मागील वर्षीची लोकसभा निवडणूक ते भाजपकडून लढले. या निवडणुकीतील त्यांचे विजयाचे श्रेय त्यांच्या पत्नी सुजाता यांना जाते. कारण त्यांच्यावर दाखल गुन्ह्यात जामीन देताना न्यायालयाने विष्णूपूर मतदारसंघात प्रवेश न करण्याची अट घातली होती. सौमित्र यांच्या प्रचारापासून  निवडणुकीची सर्वच धुरा सुजाता यांच्या खांद्यावर होती. त्यांनी एकहाती निवडणूक सांभाळत पतीला विजय मिळवून दिला होता. 

सुजाता यांनी मागील वर्षी डिसेंबर महिन्यात तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी खासदार खान यांनी पत्नीला आडनाव लावण्यास मनाई केली होते. याचबरोबर पत्नीबरोबरचे सर्व संबंधही तोडले. त्यांनी पत्नीला घटस्फोटाची नोटीसही पाठवली आहे. याचबरोबर माध्यमांनी पत्नीला खान असे आडनाव लावून संबोधू नये, असे आवाहनही त्यांनी केले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com