times now c voter opinion poll predicts clear majority to dmk in tamil nadu
times now c voter opinion poll predicts clear majority to dmk in tamil nadu

ओपिनियन पोल : तमिळनाडूत स्पष्ट बहुमतासह स्टॅलिन मिळवणार सत्ता

तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे वातावरण तापले आहे. जनमत चाचणीत द्रमुक आणि काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा कौल आला आहे.

चेन्नई : तमिळनाडूत विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकमध्ये थेट लढत आहे. आता टाईम्स नाऊ-सी-व्होटरने केलेल्या ओपिनियन पोलमध्ये (जनमत चाचणी) अण्णाद्रमुक आघाडीचा पराभव करुन द्रमुक आघाडी 158 जागा मिळवून सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

तमिळनाडूत सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भाजपची आघाडी आहे. या विरोधात द्रमुक आणि काँग्रेसची आघाडी आहे. माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांनी राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली आहे. त्यांचे पुतणे आमदार टी.टी.व्ही. दिनकरन यांनी मात्र, मागे न हटता निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. आता त्यांना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची साथ मिळाली आहे. त्यांच्या या आघाडीचा सर्वाधिक फटका सत्ताधारी अण्णाद्रमुकला बसण्याची चिन्हे आहेत.  

जनमत चाचणीनुसार, अण्णाद्रमुकच्या जागांमध्ये मोठी घसरण होईल. मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णाद्रमुकला केवळ 65 जागा मिळतील. मागील विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकला 136 जागा मिळाल्या होत्या. द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांच्या नावाला मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती मिळाली आहे. सुमारे 28 टक्के जनतेने त्यांच्या नावाला पसंती दिली आहे. याचवेळी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या नावाला 31 टक्के आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी केवळ 7.4 टक्के नागरिकांनी पसंती दिली आहे.  

शशिकला आणि दिनकरन यांची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी झाली होती. त्यावेळी दिनकरन यांनी स्व:तचा एएमएमके पक्ष स्थापन केला होता. त्यांनी जयललितांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आर.के.नगर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ती जिंकून त्यांनी अण्णाद्रमुकला मोठा धक्का दिला होता. याचबरोबर मागील लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांना एकही जागा मिळाली नव्हती मात्र, त्यांच्या पक्षाच्या मतांचा टक्का 8.46 टक्के होता. त्यांचे उमेदवार राज्यात तिसऱ्या स्थानी होते. त्यांनी प्रामुख्याने अण्णाद्रमुकची मते खाल्ली. 

दिनकरन यांचा पक्ष विधानसभा निवडणुकीतही प्रामुख्याने अण्णाद्रमुकची मते खाणार आहे. त्यांच्यासोबत ओवेसी आल्याने त्यांना आणखी बळ मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. भाजपने हा धोका आधीच ओळखून दिनकरन यांना सोबत घ्यावे, यासाठी अण्णाद्रमुकवर दबाव आणला होता. परंतु, मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी याला स्पष्ट नकार दिला होता. आता शशिकला यांनी राजकीय निवृत्ती घेतली असली तरी आगामी काळात त्या भाच्याचा बाजूने पडद्यामागून सूत्रे हलवू शकतात, अशीही शक्यता आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com